महाराष्ट्रात एकही मराठी शाळा बंद पडू देणार नाही; अकोला पॅटर्न राज्यभर राबवणार - सुजात आंबेडकर, शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी वंचितचे उमेदवार जाहीर

by Team Satara Today | published on : 10 October 2026


सातारा : महाराष्ट्रातील एकही मराठी शाळा बंद पडू देणार नाही, तसेच अकोला जिल्ह्यात राबविण्यात आलेला शैक्षणिक पॅटर्न संपूर्ण राज्यात लागू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ठाम भूमिका वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी मांडली. शिक्षणाच्या वाढत्या बाजारीकरणावर टीका करतानाच शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, शाळांची सद्यस्थिती आणि ग्रामीण विद्यार्थ्यांना उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक सुविधांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. शिक्षक मतदारसंघातून डॉ. इकबाल चंदुलाल शेख, तर पदवीधर मतदारसंघातून प्रा. सोमनाथ साळुंखे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रातील अनुभव आणि या क्षेत्रातील प्रश्नांची जाण असलेल्या उमेदवारांना पक्षाने संधी दिल्याचे सुजात आंबेडकर यांनी सांगितले. प्रा. सोमनाथ साळुंखे यांनी तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात अध्यापन करताना विद्यार्थ्यांना संशोधन, तंत्रज्ञान आणि प्रयोगांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
राज्यातील मराठी शाळा बंद होण्याच्या प्रक्रियेवर भाष्य करताना आंबेडकर यांनी अकोला जिल्ह्यातील शैक्षणिक कामाचा दाखला दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार, अकोला जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत ८० नवीन शाळा सुरू करण्यात आल्या असून, एकही शाळा बंद पडू न देण्याची भूमिका घेण्यात आली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबतच पोलीस भरती, वनविभाग आणि अन्य स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी, यासाठी व्यायामशाळा आणि अभ्यासाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या समान संधी मिळाव्यात आणि आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या प्रगतीत अडथळे निर्माण होऊ नयेत, या दृष्टिकोनातून हा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
शिक्षकांच्या विविध प्रश्नांवरही सुजात आंबेडकर यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली. शिक्षक भरतीतील अडचणी, वेतनाचे प्रश्न, सेवानिवृत्त शिक्षकांची पेन्शन आणि शिक्षण सेवक पद्धतीमुळे निर्माण झालेल्या समस्यांकडे सरकारने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणव्यवस्थेतील प्रश्न प्रलंबित असताना शाळा बंद होण्याची परिस्थिती निर्माण होणे, ही चिंतेची बाब असल्याचे नमूद करत मराठी शाळा सक्षम करणे, शिक्षकांना न्याय देणे आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिक्षक आणि पदवीधरांचे प्रश्न विधान परिषदेत प्रभावीपणे मांडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहेत. मराठी शाळांचे अस्तित्व, शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, ग्रामीण विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा आणि शिक्षणातील समान संधी या मुद्द्यांवर पक्षाकडून भर दिला जात आहे. त्यामुळे पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत या प्रश्नांची चर्चा केंद्रस्थानी येण्याची शक्यता असून, उमेदवारांची भूमिका आणि मतदारांचा प्रतिसाद याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शिक्षक-प्राध्यापक संघटनांच्या पाठिंब्यावर प्रा. सचिन सानप यांची उमेदवारी कायम; आव्हानाला सामोरे जाण्याची माझी पूर्ण तयारी
पुढील बातमी
सातारा शहर पोलिसांची कारवाई: ज्वेलर्स दुकानफोडीप्रकरणी दोघांना अटक; १०.३० लाखांचा ऐवज जप्त,

संबंधित बातम्या