बोरगाव येथील के पॉवर अँड पेपर लिमिटेड पेपर मिलला आग; कोट्यवधींचे नुकसान, नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही

by Team Satara Today | published on : 10 March 2026


सातारा : बोरगाव (ता. सातारा) येथील के पॉवर अँड पेपर लिमिटेड या कंपनीला मंगळवारी दुपारी भीषण आग लागून कंपनीचे मोठे नुकसान झाले. या आगीत कंपनीतील देशी-विदेशी कच्चा माल, मशीनरीचे स्पेअर पार्ट, इलेक्ट्रिक केबल, बेल्ट तसेच लाकडाचा साठा जळून खाक झाला.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास कंपनीच्या उत्तर बाजूस गवताला आग लागल्याचे दिसून आले. जोरदार वाऱ्यामुळे ही आग झपाट्याने पसरत कंपनीच्या परिसरात शिरली. काही वेळातच आगीने विक्राळ रूप धारण केले आणि कंपनीतील मोठ्या प्रमाणातील साहित्य जळून खाक झाले. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. आगीची माहिती मिळताच अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची अग्निशमन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. तसेच नागठाणे येथील खाजगी पाण्याचे टँकरही मदतीसाठी पोहोचले. दिवसभर प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्यात यश आले.

या आगीत कंपनीच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या उसाच्या शेतातील ड्रीप लाईन तसेच इतर साहित्य जळाल्याची माहिती मिळाली आहे. आगीमुळे बोरगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरले होते. प्राथमिक अंदाजानुसार या आगीत कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, पोलीस उपनिरीक्षक मच्छद्रिं पाटील, डी.बी. पथक तसेच नागठाणे महावितरणचे अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोरेगावातील नगरपंचायतीच्या कचरा डेपोला भीषण आग; नागरिक व प्रशासनाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे आग नियंत्रणात आणण्यात यश
पुढील बातमी
खिंडवाडी येथे वाहनाच्या धडकेने बिबट्याच्या मृत्यू ; गेल्या आठ वर्षातील ही पाचवी घटना, डोंगरावरील वणवेच कारणीभूत

संबंधित बातम्या