बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, सातारा सेंटरतर्फे ‘रचना २०२६’ वास्तू प्रदर्शनाचे आयोजन - कौस्तुभ मोरे

दि. २६ ते २९ नोव्हेंबरदरम्यान प्रदर्शन; पोलीस परेड ग्राउंडवर १०० हून अधिक स्टॉल्स, प्रवेश विनामूल्य

by Team Satara Today | published on : 21 November 2026


सातारा : शहर व जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील नागरिक ज्या वास्तू प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत असतात, असे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, सातारा सेंटरतर्फे आयोजित ‘रचना २०२६’ हे बांधकाम क्षेत्रातील भव्य प्रदर्शन दि. २६ ते २९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत सातारा येथील पोलीस परेड ग्राउंडवर आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दररोज सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार असून, प्रवेश विनामूल्य आहे. प्रदर्शनाला भेट देण्यासाठी पूर्वनोंदणी करणे आवश्यक असून, https://vms.ruha.co.in/registration/rachana-visitor या लिंकवरून सहज नोंदणी करता येणार आहे.
या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजकत्व स्कॉन इन्फ्रा प्रेस्टेस एलएलपी, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि कंग्राळकर असोसिएट्स यांनी स्वीकारले आहे. तसेच सहप्रायोजक म्हणून उत्थान एलिव्हेटर्स, नवनीर्मिती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि परफेक्ट हाऊस प्रा. लि. यांचे सहकार्य लाभले आहे, अशी माहिती बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, सातारा सेंटरचे चेअरमन कौस्तुभ मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना असोसिएशनचे सेक्रेटरी नीलेश शिंदे म्हणाले, की आपल्या स्वप्नातील घर शोधणाऱ्या तसेच रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करून आपल्या पैशाचा योग्य मोबदला मिळवू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी ‘रचना २०२६’ हे प्रदर्शन एक उत्तम संधी ठरणार आहे. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, सातारा शाखा यंदा स्थापनेचे ३६ वे वर्ष साजरे करीत आहे.
आगामी काळात सातारा शहर आणि परिसरात रिअल इस्टेट व बांधकाम व्यवसायासाठी मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. सातारा आणि आसपासच्या परिसरात सुरू असलेले तसेच प्रस्तावित असलेले महत्त्वाकांक्षी शासकीय प्रकल्प, वाढती औद्योगिक गुंतवणूक, प्रस्तावित आयटी पार्क, विस्तारणारी एमआयडीसी आणि वैद्यकीय महाविद्यालय यांमुळे सातारा शहराच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. परिणामी शहराची लोकसंख्याही झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सातारा शहर व परिसर गुंतवणूकदारांसाठी आकर्षक केंद्र ठरणार असून, आगामी काळात येथील रिअल इस्टेट क्षेत्राला उज्ज्वल भविष्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘रचना २०२६’ हे प्रदर्शन केवळ घरांची खरेदी-विक्री करण्याचे व्यासपीठ नसून, घर बांधणीपासून ते घराच्या सजावटीपर्यंत आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींची माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे परिपूर्ण व्यासपीठ आहे. यामध्ये इंटेरिअर डिझाइन, बांधकाम साहित्य, अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्लंबिंग, किचन, गार्डनिंग तसेच घराच्या सौंदर्यवृद्धीसाठी आवश्यक असलेल्या विविध नावीन्यपूर्ण संकल्पनांचा समावेश असणार आहे.
बदलत्या आर्थिक परिस्थितीत बँकांकडून गृहकर्जासाठी आकर्षक व्याजदर आणि विविध सुविधा उपलब्ध होत आहेत. त्याचबरोबर अनेक बांधकाम व्यावसायिक आकर्षक योजनांसह या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. त्यामुळे स्वतःचे घर खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही योग्य संधी ठरणार आहे.
या प्रदर्शनात सुमारे १०० स्टॉल्स उभारण्यात येणार असून, त्यामध्ये बांधकाम व्यावसायिकांचे विविध प्रकल्प, किचन इक्विपमेंट्स, इलेक्ट्रिकल अॅक्सेसरीज, आधुनिक बांधकाम साहित्य, स्विमिंग पूल, गार्डनिंग, फिटनेस इक्विपमेंट्स यांसह बांधकाम क्षेत्राशी संबंधित विविध उत्पादने व सेवांचा समावेश असेल. नवीन तंत्रज्ञान, आधुनिक बांधकाम पद्धती आणि आकर्षक गृहसंकल्पना यांची माहितीही नागरिकांना एकाच ठिकाणी मिळणार आहे.
‘रचना २०२६’ हे प्रदर्शन भव्य, आकर्षक आणि अत्याधुनिक स्वरूपात साकारण्यासाठी सातारा सेंटरचे सर्व पदाधिकारी व सभासद विशेष मेहनत घेत आहेत. सातारा शहर, तालुका व जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून बांधकाम क्षेत्राशी संबंधित व्यावसायिक, ग्राहक आणि नागरिक या प्रदर्शनाला भेट देणार आहेत. चार दिवसांत तीन लाखांहून अधिक नागरिक प्रदर्शनाला भेट देतील, असा आयोजकांचा अंदाज आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.
‘ना नफा, ना तोटा’ हे तत्त्व डोळ्यांसमोर ठेवून बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, सातारा सेंटरतर्फे दरवर्षी या प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. स्वतःची व्यावसायिक कामे बाजूला ठेवून असोसिएशनचे सर्व सभासद या प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेत असतात. बांधकाम व्यवसायाला नवी ऊर्जा मिळावी, ग्राहकांना विविध पर्यायांची माहिती मिळावी आणि त्यांनी केलेल्या गुंतवणुकीतून त्यांना योग्य मोबदला व समाधान मिळावे, हा या प्रदर्शनामागील मुख्य उद्देश आहे.
‘रचना २०२६’ प्रदर्शनातील स्टॉल बुकिंगसाठी ९७६७०००६७० या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा www.baisatara.com या संकेतस्थळाला भेट देऊन थेट स्टॉल बुकिंग करता येईल, असे आवाहन बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, सातारा सेंटरतर्फे करण्यात आले आहे.
यावेळी असोसिएशनचे माजी स्टेट चेअरमन सचिन देशमुख, उपाध्यक्ष हर्षद वालावलकर, ट्रेझरर शरद जाधव, कौन्सिल मेंबर रामदास जगताप, संतोषकुमार जगताप आदींनी प्रदर्शनाची माहिती दिली. यावेळी असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पानटपऱ्यांमधून नशेचा धंदा खपवून घेतला जाणार नाही : पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांचा इशारा
पुढील बातमी
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा

संबंधित बातम्या