खंडाळा : गॅस टँकरमधून गॅसची चोरी करून तो सिलिंडरमध्ये भरून विक्री करणार्या टोळीचा मुंबईच्या दक्षता पथकाने पर्दाफाश केला आहे. मंगळवार, दि. 8 रोजी दक्षता पथकातील कर्मचार्यांनी खंबाटकी घाटानजीक एका बंद पडलेल्या ढाब्यानजीक छापा टाकून गॅसची चोरी करताना गॅस तस्करांना पडकले. या कारवाईत दोघांना अटक केली असून वाहने व गॅस सिलिंडर असा तब्बल 80 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मोहम्मद तौफिक व हरीओम सिंग अशी संशयितांची नावे आहेत. देवराज जानी याचा हा अवैध उद्योग असल्याचे समोर आले आहे. या कारवाईत 2 गॅस टँकर, 2 टेम्पो, 200 सिलिंडर व चोरी करण्याचे साहित्य असा 80 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी खंडाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र नियंत्रक शिधावाटप व नागरी पुरवठा विभागाचे संचालक सुधाकर तेलंग यांना खंबाटकी घाटात गॅसची चोरी होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी उपनियंत्रक (शिधावाटप) गणेश बेल्लाळे व सहायक नियंत्रक (शिधावाटप) विनायक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक बनवून सातारा येथे पाठवले. मुंबई येथील हे दक्षता पथक गेल्या दोन दिवसांपासून या ठिकाणी पाळत ठेवून होते. मंगळवार, दि. 8 रोजी सातारा-पुणे रस्त्यावर खंबाटकी घाट पायथ्याजवळ बंद पडलेल्या एका ढाब्यावर गॅस चोरी करताना संशयितांना पकडले. यामध्ये काही संशयित पसार झाले. या कारवाईत पुरवठा विभागाचे राजीव भेले, प्रकाश पराते, मच्छिंद्र कुठे, सुधीर गव्हाणे, चंद्रकांत कांबळे, सागर वराळे, संदीप दुबे यांनी सहभाग घेतला.