सातारा : रयत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राच्या कानाकोपर्यामध्ये शिक्षणाची गंगा वंचितांपर्यंत पोहोचवली आहे. आजच्या आधुनिक युगामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी एआय तंत्रज्ञान कसे उपलब्ध करता येईल याबाबत गांभीर्याने विचार सुरू आहे, असे स्पष्ट प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजन मंत्री व रयत मॅनेजिंग कौन्सिल सदस्य अजितदादा पवार यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल ची बैठक शिवाजी कॉलेजच्या एन डी पाटील ऑडिटोरियममध्ये पार पडली. तब्बल चार तास ही बैठक चालली होती. या बैठकीला राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार तसेच माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, सचिव विकास देशमुख तसेच कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते.
या बैठकीला शरद पवार व अजितदादा पवार हे एकत्र चार तास शेजारी शेजारी बसून होते. त्यांनी अनेक विषयांवर चर्चा केली. त्यामुळे प्रसार माध्यमांसाठी सुद्धा ही बैठक उत्सुकतेचा विषय होती. बैठकीनंतर शरद पवारांनी प्रसार माध्यमांना टाळले. मात्र तेथून बाहेर पडल्यानंतर अजितदादा पवार यांना प्रसारमाध्यमांनी गराडा घातला. त्यावेळी अजितदादा पवार यांनी अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.
बैठकीच्या संदर्भात बोलताना अजितदादा म्हणाले, मॅनेजिंग कौन्सिलच्या महत्त्वाच्या धोरणात्मक विषयांवर सखोल चर्चा झाली. यामध्ये अभिमत विद्यापीठे, त्यांचे विस्तारीकरण सक्षमीकरण याशिवाय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एआय तंत्रज्ञान म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि कौशल्य विकास या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. हे तंत्रज्ञान टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांना कसे उपलब्ध करून देता येईल याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच अनेक राजकीय विषयांवर चर्चा करणे दादांनी टाळले. तरीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निधी संकलनाच्या नाराजीबाबत त्यांना छेडले असता ते म्हणाले, असे काहीच नाही. मी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कॅबिनेट मीटिंगला नेहमीच भेटत असतो. अनेक विषयांवर चर्चा होत असते. नाराजी वगैरे काही नाही. त्यांना जर बोलायचेच असते तर त्यांनी थेट भाजपच्या श्रेष्ठींशी चर्चा केली असती, असे म्हणत त्यांनी ते वृत्त फेटाळले.
अजितदादा पवार यांचे सायंकाळी साडेचार वाजता आगमन झाले. तत्पूर्वी शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील सर्किट हाऊस वरून एकाच गाडीतून बैठकीला आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. पोलीस कवायत मैदानावर शरद पवार यांची बाळासाहेब पाटील यांनी भेट घेतली. त्यांना तत्पूर्वीच राष्ट्रवादीचे चिटणीस राजकुमार पाटील यांच्याकडून पेढ्यांचा बॉक्स मिळाला. त्यानंतर पाटील यांचे आगमन झाले तेव्हा तुमच्या विजयाचे पेढे मिळाले, अशी मिश्किली शरद पवार यांनी केली.