सातारा : सेवा संकल्प अभियानांतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी सातारा पूर्व प्रकल्पातील म्हसवड येथील अंगणवाडी क्रमांक 83 मध्ये विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात बालविवाह प्रतिबंध कायदा, त्याचे दुष्परिणाम, बालसुरक्षा, बालकामगार कायदा तसेच चाईल्ड हेल्पलाईन या विषयांवर उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी तज्ञ वकील ॲड. स्मिता राऊत आणि ॲड. राधिका प्रथमशेट्टी मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. उपस्थितांना मार्गदर्शन करताना ॲड. स्मिता राऊत व ॲड. राधिका प्रथमशेट्टी यांनी सांगितले की, बालविवाह ही एक अनिष्ट प्रथा असून यामुळे मुला-मुलींच्या शारीरिक, मानसिक व शैक्षणिक विकासावर गंभीर परिणाम होतो. बालविवाह रोखण्यासाठी कायद्यात कडक तरतुदी करण्यात आल्या असून समाजाने याविरोधात जागृत राहणे गरजेचे आहे.
तसेच बालकामगार प्रथा रोखणे आणि मुलांचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. अडचणीत सापडलेल्या बालकांच्या मदतीसाठी चाईल्ड हेल्पलाईन या आपत्कालीन सेवेचा वापर कसा करावा, याविषयीही यावेळी उपस्थितांना सविस्तर माहिती देण्यात आली.
या मार्गदर्शन शिबिराला स्थानिक नागरिक, महिला आणि अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाचे आणि आयोजकांचे आभार मानले.
म्हसवड येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत बालसुरक्षा आणि कायद्यांविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न
by Team Satara Today | published on : 30 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा