सातारा : सातारा पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून सोमवारी गुरुवार परज येथील पत्र्याचे शेड, टपऱ्या व अतिक्रमणे हटवून हे मैदान अतिक्रमणमुक्त करण्यात आले. पालिकेने केलेल्या या कारवाईबाबत नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.
गुरुवार परज परिसरात पालिकेकडून शॉपिंग सेंटरची उभारणी केली जाणार आहे. या कामाला प्रारंभ करण्यापूर्वी या मैदानावर उभारण्यात आलेली अतिक्रमणे हटविण्याची कारवाई पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने हाती घेतली होती. दोन दिवसांपूर्वी हे पथक कारवाईसाठी गेले असता अतिक्रमणधारकांनी कर्मचाऱ्यांशी वाद घालून अतिक्रमण हटविण्यास विरोध
दर्शविला होता. यावेळी पालिकेने संबंधितांना दोन दिवसांत अतिक्रमण हटवावेत, अन्यथा पालिकेकडून ते हटविले जातील, असा इशारा दिला होता.
मुदत संपल्याने सोमवारी सकाळी अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख प्रशांत निकम यांच्यासह कर्मचारी यंत्रणेसह गुरुवार परजावर दाखल झाले. यावेळी काही शेडधारकांनी स्वत:हून आपले शेड हटविले तर काहींनी ते हटविण्यासाठी विरोध दर्शविला; मात्र, पथकाने सर्व विरोध झुगारुन परजावरील शेड, टपऱ्या व अन्य अतिक्रमणे हटवून हे मैदान मोकळे केले.