सातारा पोलीस दलातील बाळासाहेब भालचीम यांना राष्ट्रपती पदक

बनकर आणि जाधव यांचा ‘महासंचालक विशेष सेवा’ने सन्मान

by Team Satara Today | published on : 16 August 2025


सातारा : वाई पोलीस उपविभागाचे उपअधीक्षक बाळासाहेब भालचीम यांना प्रशंसनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक मिळाले आहे, तसेच जिल्ह्यातील दोन पोलिसांना पोलिस महासंचालक विशेष सेवा पदक मिळाले आहे. या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात गौरविण्यात आले.

पोलिस दलात उल्लेखनीय काम करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध पदकांनी गौरवण्यात आले आहे. त्यामध्ये पोलीस सेवेत प्रशंसनीय काम केल्याबद्दल वाईचे पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब यशवंत भालचीम प्रशंसनीय सेवेबद्दल राष्ट्रपती यांचे पदक जाहीर झाले आहे.

त्याचबरोबर फलटण ग्रामीणचे हवालदार विक्रम अंकुश बनकर व मोटार परिवहन विभागात कार्यरत असणारे मनोजकुमार विश्वनाथ जाधव यांना कृती दल विशेष पदक मिळाले आहे. हे दोन्ही पोलीस मुंबई पोलीस दलातील शीघ्र प्रतिसाद पथकात कार्यरत होते. २६/११ च्या हल्ल्यानंतर या पथकाची स्थापना करण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांना खडतर प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. दोघांनी २०१० ते २०१७ या कालावधीत या पथकात काम केले. हे विशेष दल असल्याने तेथे केलेल्या सेवेबद्दल दोघांना विशेष सेवा पदक देण्यात आले आहे.

वाई तालुक्याच्या सुपुत्राचाही गौरव

पिराचीवाडी-आसले (ता. वाई) येथील सुपुत्र व घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश भगवान जाधव यांना गुणवत्तापूर्वक सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. पदक जाहीर झाल्यानंतर त्यांचे मूळगावी पिराचीवाडी येथे ग्रामस्थांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कार्वेनाका परिसरात झालेल्या पाच घरफोड्या उघड
पुढील बातमी
फलटण येथे ध्वजारोहणानंतर युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

संबंधित बातम्या