सातारा : अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वेबसाईटचे काम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंद पाडल्याचा गंभीर आरोप नरेंद्र पाटील यांनी केला होता तो निरर्थक आरोप आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्याकडून मराठा तरुणांची सुद्धा दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा महामंडळानं केला आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे काम सुरळीत सुरू असल्याचे महामंडळाच्यावतीनं प्रेस नोट काढून जाहीर करण्यात आले आहे.
मराठा समाजातील तरुणांना आर्थिक मदत करणाऱ्या अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वेबसाईटचं काम उपमुख्यंमत्री अजित पवार यांनी बंद पाडलं आहे. यामुळं व्याज परतावा थांबवण्यात आल्यानं मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत, असे गंभीर आरोप अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले होते. पण त्यांच्या आरोपांना आता महामंडळाकडूनच एक निवेदन सादर करत उत्तर देण्यात आलं आहे. यामध्ये सर्व तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. वेबसाईटच्या सुधार प्रक्रियेमुळं महामंडळाचे नवीन पात्रता प्रमाणपत्र देण्याचे काम वगळता इतर सर्व कामकाज सुरळीतपणे सुरु असल्याचं महामंडळाच्यावतीनं व्यवस्थापकीय संचालक विजय देशमुख यांच्याकडून जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळं नरेंद्र पाटील यांनी राजकीय हेतूपोटी हे आरोप केले असल्याचेही महामंडळाकडून प्रसिद्ध केलेल्या निवदेनात म्हटलं आहे.