महिला पोलिसांनी धरला चक्क फुगड्यांचा फेर

जिल्हा पोलीस दलातर्फे मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन

by Team Satara Today | published on : 28 July 2025


सातारा : सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस दलातील महिला अधिकार्‍यांनी कर्मचार्‍यांसाठी पारंपारिक मंगळागौर नागपंचमी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एरवी कर्तव्यपूर्तीच्या कामात मग्न असणार्‍या महिला पोलीस अधिकार्‍यांनी या कार्यक्रमानिमित्त चक्क फुगड्यांचा फेर धरत मंगळागौरीच्या पारंपारिक कार्यक्रमाचा आनंद लुटला. 

पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या पत्नी भाग्यश्री दोशी यांच्या हस्ते करण्यात आले. आरती गुन्हे शाखेच्या पोलीस उपअधीक्षक आश्लेषा हुले तसेच सर्व पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी, महिला पोलीस अंमलदार सखी मंडळ सोलापूर यांच्या महिला सदस्य यांनी या कार्यक्रमात भाग घेतला होता. अनेक प्रकारच्या फुगड्या, सूप, लाटणे, मुसळ यांसारख्या खेळांचे प्रात्यक्षिक या कार्यक्रमाच्या निमित्ताने रंगले. गृहउपयोगी साहित्य सोबत मंगळागौरीचे खेळ उस्फूर्तपणे खेळण्यात आले. मंगळागौर-नागपंचमी या खेळातील आनंदासोबत शरीराला व्यायाम कसा होतो, याचे महत्त्व सोलापूरच्या स्वरूप सखी मंडळाच्या वतीने सांगण्यात आले. 

अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम महिला पोलीस कर्मचार्‍यांसाठी आयोजित करण्यात आला. यामुळे महिला पोलीस कर्मचार्‍यांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती आश्लेषा हुले, पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा काटकर, श्वेता पाटील, माधुरी देशमुख, मोना निकम, मुनीर मुल्ला यांनी विशेष परिश्रम घेतले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बालरंगभूमी परिषदेतर्फे साजरा होणार मराठी बालनाट्य दिवस
पुढील बातमी
सहकारातून जावली तालुक्याचा कायापालट होईल

संबंधित बातम्या