सातारा : सातारा शहरालगत असणार्या खेड जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीवर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून भंगार चोरीच्या माध्यमातून झोल करणार्या विरोधी उमेदवाराला लोळवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे खेड गटातील उमेदवार कामेश कांबळे सज्ज झाले असून दर निवडणुकीला जाऊ तिथं खावू हा फंडा अवलंबणार्या भाजपच्या उमेदवाराला खेड ची जनता यंदा तडीपार करणार, अशा चर्चा खेड जिल्हा परिषद गटामध्ये चर्चिल्या जावू लागल्या आहेत.
यंदा खेड जिल्हा परिषद गट अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. सातारा तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचा कोणताही गट अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर पहिला माझा नंबर, असे म्हणत थोरल्या महाराजांचे उपरणे गळ्यात टाकून खेड जिल्हा परिषद गटातील विद्यमान उमेदवारांनी आतापर्यंतच्या उमेदवार्या मिळवल्या. मधल्या काळामध्ये यांना खटावच्या जननायकाचा परिसस्पर्श लाभला. त्यामुळे त्यांनी थोरल्या महाराजांचे उपरणे माहुलीच्या पुलावरुन कृष्णेला स्वाहा केले. ज्या ल्हासुर्णेच्या रमेशरावांनी खटावच्या साहेबांकडे यांचा चंचूप्रवेश करुन दिला, त्याच रमेशरावांना त्यांनी त्रिपुटीची खिंड दाखवली. कधीकाळी आरपीआयच्या बॅनरखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोतराज बनून चवण्णी-अठण्णी गोळा करणार्या विद्यमान भाजप उमेदवाराला जलमंदिराचा परिसस्पर्श झाला. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी त्यांना थोरले महाराज दिसू लागले. महाराजांनीही पोरगं पाठिमागं फिरतंय म्हणून त्याला वनवासवाडीपर्यंतच्या उमेदवार्या दिल्या. मात्र, यांनी वनवासवाडीला वनवासातून मुक्त न करता त्या गटातील जनतेला पाठिमागच्या बाकावर बसवून त्यांना उपेक्षित ठेवले. म्हणजेच वनवासवाडीचा वनवास त्यांनी पाच वर्षाच्या कालावधीमध्ये संपवला नाही. जो वनवास वनवासवाडीकरांना भोगायला लागला, तोच वनवास खेडवासियांच्या नशिबी न येण्यासाठी खेड जिल्हा परिषद गटाचे उच्च विद्याविभूषित राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार कामेश कांबळे यांनी शड्डू ठोकला आहे. कोणताही उपरा येवो, त्याला आस्मान दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा पण केला आहे.
कामेश कांबळे उच्च विद्याविभूषित आहेत, स्थापत्य शास्त्राचे ते पदवीधर आहेत. मात्र, समोरील उमेदवार शाळेत तरी गेला आहे काय, असा प्रश्न खेड गटातील जनतेला पडलेला आहे. खेड हे सातारा शहरालगतचे उपनगर. सातारा शहर जसजसे वाढत आहे, तसे खेडला महत्त्व प्राप्त होत आहे. सातार्यातील बहुचर्चित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयही आता खेडच्या भूमिवरच आकारास येत आहे. भविष्यामध्ये सातारा शहराचे हे लँडमार्क ठरणार आहे. परंतू या लँडमार्कच्या पायाभरणीलाच या शासकीय महाविद्यालयालाच भंगार चोरीची दृष्ट लागली होती. यामध्ये अनेकांनी मी स्थानिक आमदाराच्या जवळचा, असे म्हणत मूळ जलसंपदा विभागाच्या असणार्या इमारती बेकायदा पाडून (याच्या निविदाच काढण्यात आल्या नव्हत्या) त्यामधून निघालेले कोट्यवधी रुपयांचे भंगार घशात घालून शासनासह सामान्य लोकांचीही कोट्यवधी रुपयांची लूट केली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे तत्कालीन आमदार शशिकांत शिंदे यांनी याबाबत विधान परिषदेमध्ये तारांकित प्रश्न उपस्थित करुन या भंगार चोरांचा बुरखा टराटरा फाडला होता. दिवसाढवळ्या दरोडे घातले जावू शकतात, हे या घटनेतून सध्याचे खेड जिल्हा परिषद गटातील भाजपच्या उमेदवारांनी दाखवून दिले होते, असा आरोपही शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेमध्ये केला होता. त्यामुळे राज्यभरामध्ये खळबळ उडाली होती. मात्र, खटावच्या साहेबांचा आशिर्वाद असल्याने यांच्या विजारीच्या सुटलेल्या नाड्यांना पुन्हा एकदा गाठ बसलेली होती. पण, ही गाठ फार काळ टिकत नाही. कारण, आता गाठ थेट खेड करांशी बसलेली आहे. ज्यांनी आपल्या जमिनी या शासकीय महाविद्यालयासाठी दिलेल्या आहेत, अशा लोकांच्या तोंडाला पाने पुसून या आयात उमेदवाराने शासकीय महाविद्यालयातील उपहारगृह, सुरक्षा रक्षक व इतर ठेके खटावच्या साहेबांच्या आशिर्वादाने मिळवले आहेत. भविष्यात हे या गटातून निवडून आल्यास खेडवासियांना शासकीय महाविद्यालयातील आवारातच काय, पण स्वत:च्या गावातही राहणे मुश्कील होईल, अशी भीेती आता खेड मधील मतदारांमध्ये निर्माण झाली आहे.
भाजपचा जो उमेदवार आहे, त्याचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ हा निश्चितच काळवंडलेला आहे. यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी काय होती, कोणाच्या बोटाला धरुन हे राजकीय क्षेत्रामध्ये आले, हे जर सुजाण खेड करांना समजले तर यांची अनामत रक्कम म्हणजे डिपॉझिटही राहणार नाही. लिहिण्यासारखे खूप काही आहे. परंतू समझने वाले को इशारा काफी आहे. प्रत्यक्ष मतदानाला आता चोवीस तास उरलेले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा उमेदवार स्थानिक म्हणजेच भूमिपूत्र आहे. येथील समस्या काय आहेत, हे त्याला पुरेपूर माहित आहे. स्थापत्य शास्त्रातील पदवीधर असल्याने प्रलंबित कामांवर आणि समस्यांवर उपचार कसे करावेत, हे त्याला चांगले माहित आहे. पावसाळ्यात ठिकठिकाणी भूछत्रे उगवत असतात. पावसाळा संपल्यानंतर त्यांचे अस्तित्व राहत नाही. त्याचप्रमाणे निवडणुका लागल्यानंतर हौशे, गवशे, नवशे आणि उपरेही आपल्या हाताच्या बेंडकुळ्या फुगवून वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. मी महाराजांचा, महाराज माझे, ही मोडस वापरुन यांनी यापूर्वी दोनवेळा गमजा मारल्या. यावेळी ते खटावच्या साहेबांचे उपरणे गळ्यात घालून नशिब आजमावू पाहत आहेत. मात्र, या लढाईमध्ये विजय हा भूमिपूत्राचाच ठरलेला आहे. खेडवासियांना यापुढील पाच वर्षामध्ये सुख-शांती, विकास आणि सुबत्ता हवी असेल तर कामेश कांबळेंशिवाय त्यांना दुसरा पर्याय नाही. मात्र, राजकीय अस्तित्वाच्या साठेमारीत खटावच्या साहेबांनी कितीही ताकद लावली तरी ती ताकद 9 तारखेला खुजी ठरणार आहे, हे निर्विवाद सत्य आहे.