सातारा : सामाजिक विषमता, अंधश्रद्धा आणि जातीयतेच्या विरोधात उभ्या राहणार्या चळवळी अधिक मजबूत होण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी व्यक्त केले. भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेतर्फे आयोजित सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.
फुले-आंबेडकर पुरस्काराने गौरविल्यानंतर परुळेकर यांनी समाजातील उपेक्षित घटकांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवण्याची भूमिका स्पष्ट केली. भटके-विमुक्त समाजाचा संघर्ष हा केवळ हक्कांसाठी नसून सामाजिक स्वाभिमानासाठी आहे, असे ते म्हणाले.
सातार्यात झालेल्या या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, साहित्यिक लक्ष्मण माने, डॉ. प्रकाश जाधव, डॉ. शिवलाल जाधव, गणेश काळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी खासदार श्रीनिवास पाटील यांनी भूषविले.
यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. प्रकाश जाधव यांना ‘यलप्पा वैदू स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला, तर सामाजिक कार्यासाठी गणेश काळे यांना विशेष जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला.
प्रास्ताविकात साहित्यिक लक्ष्मण माने यांनी परिवर्तनवादी विचारसरणी जिवंत ठेवण्याची आवश्यकता अधोरेखित केली. समाजात भीती आणि द्वेषाचे वातावरण वाढत असताना फुले-आंबेडकर विचार अधिक महत्त्वाचे ठरत आहेत, असे ते म्हणाले.
डॉ. प्रकाश जाधव यांनी मनोगतात साहित्य हे समाजजागृतीचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. दलित, भटके आणि वंचितांच्या वेदना साहित्याच्या माध्यमातून समाजासमोर मांडल्या गेल्या, त्यामुळे परिवर्तनाच्या चळवळींना दिशा मिळाली, असे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात श्रीनिवास पाटील यांनी समाजहितासाठी कार्य करणार्या व्यक्तींचा सन्मान हा नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे सांगितले. शिक्षण, बंधुता आणि सामाजिक समतेच्या मूल्यांवर समाज उभा राहिला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.