शासनाच्या शंभर दिवस कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा : जिल्हाधिकारी संतोष पाटील

सातारा :  शासनाने शंभर दिवस कृती आराखड्यांतर्गत  सात कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी निर्देश दिले आहेत. या अंतर्गत विविध विभागांना उद्दिष्ट देण्यात आले आहे हे उद्दिष्ट मुदतीत पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले. 

शंभर दिवस कृती आराखड्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

शंभर दिवस कृती आराखड्यामध्ये सात कलमी कार्यक्रमांतर्गत विविध बाबींचा समावेश आहे, असे सांगून जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, प्रत्येक विभागांचे संकेतस्थळ आहेत ती अद्ययावत करावी. जिल्हाधिकारी कार्यालयाचेही संकेतस्थळ अद्ययावत केले आहे. ज्या विभागांची माहिती लोकांच्या हितासाठी आहे, अशी माहिती द्यावी, ती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर अपलोड केली जाईल. कृती आराखड्यानुसार विविध विभागांनी आपले संकेतस्थळाची निर्मिती करावी. हे संकेतस्थळ आकर्षक व माहितीपूर्ण असले पाहिजे, असेही निर्देश त्यांनी दिले. 

आरोग्य विभागाने नागरिकांचे आयुष्यमान कार्ड काढण्याच्या मोहिमेला गती द्यावी व त्याचबरोबर त्याचे वितरणही लवकरात लवकर करावे, असे निर्देश देवून जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यात संकलीत होणाऱ्या दूधाचे नमुने तपासावे जर खराब दूध पिल्याने शारीरिक आरोग्य बिघडते. पर्यटन स्थळांच्या ठिकाणी अवैध दारुची विक्री होणार नाही, याची राज्य उत्पादन शुल्क विभागाने खबरदारी घ्यावी.  विविध महामंडळाकडील शासकीय योजनांची कर्जाची प्रकरणे बँकेकडे प्रलंबित आहे, अशी प्रकरणे तात्काळ अग्रणी बँकेने मार्गी लावावीत.

राज्यशासनाच्या विभागांना विभाग प्रमुखांनी भेटी द्याव्यात. कार्यालयांमध्ये अभ्यागतांना बसण्यासाठी व पिण्याच्या पाण्याची सोय करावी. तसेच आपले कार्यालय स्वच्छ राहील याची खबरदारी घ्यावी. एस.टी. महामंडळाने बसस्थानकाबरोबरच एस.टी. बसेस स्वच्छ ठेवाव्यात. शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत विद्युत वितरण कंपनीने जिल्ह्यातील गावे सौरग्राम करावीत. सातारा जिल्ह्यातील प्रमुख कार्यालये सौर ऊर्जेवर आणूण विजेच्या बाबतीत स्वावलंबी करावयाची आहेत, त्याची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयापासून करावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी पाटील यांनी बैठकीत दिले.

मागील बातमी
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त देण्यात येणाऱ्या पुरस्कार प्रस्तावास मुदतवाढ
पुढील बातमी
फलटणमध्ये आढळला जीबीएसचा रुग्ण

संबंधित बातम्या