सातारा : साताऱ्याची हवा आज पुन्हा एकदा हवा गुणवत्ता निर्देशांकाच्या शर्यतीत देशातील मोठ्या शहरांना मागे टाकत अव्वल ठरली आहे. सातारा शहरातील हवेतील प्रदूषण निर्देशांक (AQI) आज केवळ ४२ इतका नोंदवला गेला असून तो "उत्तम श्रेणी" (Good Category) मध्ये मोडतो. दिवाळीमुळे संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जात आहेत. असे असताना सातारा शहरात फटाके फोडूनही साताऱ्यातील हवेने आपली शुद्धता राखत हवा प्रदूषणाला पुरून उरले आहे. त्यामुळेच सातारकरांना मात्र शुद्ध हवेची झालर अनुभवयास मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर, देशाची राजधानी नवी दिल्ली येथील हवेतील प्रदूषणाचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले असून आज तिथला AQI (हवा गुणवत्ता निर्देशांक) तब्बल १७४ नोंदवला गेला आहे, जो "अस्वस्थकारी श्रेणी" (Unhealthy for Sensitive Groups) मध्ये गणला जातो. गेल्या चार दिवसांपूर्वी दिल्लीतील AQI तब्बल 978 पर्यंत खाली गेला होता. त्यामुळे दिल्लीकर या प्रदूषणामुळे हैराण झाले होते. दिल्लीकरांच्या आरोग्यावरही या हवा प्रदूषणाचा विपरीत परिणाम होत आहे. देशाची राजधानी असूनही शासन-प्रशासन यावर कोणतीही उपाययोजना का करत नाही? याबाबत मात्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याउलट साताऱ्यात मात्र औद्योगिक प्रदूषण नसल्यामुळे सातारा शहरातील हवामान विभाग आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, साताऱ्याच्या स्वच्छ हवेला परिसरातील हिरवळ, बाजूला लागून असलेला पश्चिम घाट, साताऱ्यातील वाहनांची कमी संख्या कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे.
दुसरीकडे, दिल्लीतील वाढत्या वाहन धुरामुळे, बांधकाम धुळीमुळे आणि हवेतील सूक्ष्म कणांच्या प्रमाणामुळे तिथली हवा अधिकाधिक प्रदूषित होत चालली आहे. आणि हवेतील प्रदूषणामुळे दिल्लीतील लोकांचे सरासरी आयुर्मान बारा वर्षांनी कमी होत चालले आहे. लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या श्वसनाच्या रोग, व्याधी होत आहेत. या पार्श्वभूमीवर सातारा शहरासह जिल्ह्यातील इतर शहरांमधील वातावरण मात्र शुद्ध आहे. आणि दिल्लीसारखी परिस्थिती न उद्भवू देण्यासाठी इथून पुढच्या काळामध्ये प्रत्येकालाच मोठे परिश्रम घ्यावे लागणार आहेत.
नको, दिल्ली – मुंबई गड्या आपला साताराच बरा..!
सातारा शहराजवळील शेंद्रे येथील साखर कारखाना सोडल्यास सातारा शहरात प्रदूषण होईल असे काही नाही, हल्ली प्रदूषणास कारणीभूत असलेल्या दुचाकी चार चाकी गाड्यांमध्येही बी.एस – ६ इंजिन तसेच इलेक्ट्रिक म्हणजेच विजेच्या बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या उपलब्ध झाल्यामुळे, वाहनांमधून होणारे प्रदूषण कमी होण्यास बऱ्याच प्रमाणावर मदत होत आहे. सातारा शहराला लागून असलेले कास, महाबळेश्वर, बामणोली येथील सदाहरित वन्यपज मुळे या परिसरातील जैवविविधता अबाधित आहे. मुंबई-दिल्ली सारख्या महानगरांमध्ये आज हवा व इतर प्रदूषणामुळे तेथे राहणाऱ्या नागरिकांचे सरासरी आयुर्मान कमी होत असताना, साताऱ्यातील शुद्ध हवेमुळे येथे राहणाऱ्या लोकांचे आयुर्मान मात्र आश्चर्यकारकरीत्या वाढत आहे. ही मात्र सातारकरांसाठी आश्वासक बाब ठरली आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
