जिल्ह्यातील दहा तालुक्यांत वन्यजीवांसाठी ४०० वनराई बंधारे उभारले; वन विभागाचा पुढाकार,वन्यप्राण्यांसाठी उपाययोजना हाती

by Team Satara Today | published on : 20 October 2026



सातारा : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या सेवा संकल्प अभियानांतर्गत वन विभागाने जिल्ह्यातील दहा तालुक्यांत ४०० वनराई बंधारे उभारले आहेत. त्यामुळे दुष्काळात वन्यजीवांसाठी जलसंधारणाचा आधार मिळून किमान पिण्यासाठी पाणी उपलब्ध राहण्यासाठी या बंधाऱ्यांचा उपयोग होणार आहे.

दुर्गम भागातील डोंगरदऱ्यातील नैसर्गिक पाण्याचा आधार वन्यप्राण्यांना असतो. मात्र, यंदा तीव्र दुष्काळात पडण्याची शक्यता असल्याने वन विभागाने वन्यप्राण्यांसाठी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. पुढील दोन महिन्यांनंतर दुष्काळात डोंगरदऱ्यातील नैसर्गिक पाणी आटल्यानंतर वन्यजीवांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. डोंगरदऱ्यांत पावसाचे पाणी अडवून वन्यप्राण्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे, तसेच भूजल पुनर्भरण आणि जलसंधारणाला चालना मिळावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. पावसाळ्यात डोंगराळ भागातून आणि ओढ्यांमधून वाहून जाणारे पाणी अडविल्यास त्याचा उपयोग होऊ शकतो.
वनराई बंधाऱ्यांमुळे पाण्याचा प्रवाह नियंत्रित होण्यास जमिनीत पाणी मुरण्यास आणि परिसरातील जलस्रोतांचे संवर्धन होण्यास मदत होते. परिणामी, विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणी पातळीला आधार मिळण्यास हातभार लागू शकतो. याचबरोबर जिल्ह्यातील काही भागांत पाणी टंचाईची चिंता कायम असताना जलसंधारणाच्या अशा उपाययोजनांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पावसाचे पाणी साठविणे, उपलब्ध जलस्रोतांचा काटकसरीने वापर करणे आणि भूजलावरील वाढता ताण कमी करणे, यासाठी वनराई बंधारे उपयुक्त ठरू शकतात. जलसंधारणासोबतच पर्यावरण संवर्धन आणि वन्यजीव संरक्षणालाही या अभियानातून प्रोत्साहन दिले जात आहे.
वन्यजीव संरक्षणासाठी जनजागृती
वन्यजीव सप्ताहानिमित्त वन विभागाकडून जनजागृती रॅली, चित्रकला व निबंध स्पर्धा, व्याख्याने आणि मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. वनक्षेत्र स्वच्छता, प्लॅस्टिक निर्मूलन, जलस्रोत संवर्धन, सर्पदंश प्रतिबंध आणि मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. छायाचित्र प्रदर्शन आणि समाजमाध्यमांद्वारेही जनजागृती करण्यात येणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
डॉ. स्मिता जाधव यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीही मैदानात; विजयासाठी सक्रियपणे कामाला लागण्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचा आदेश

संबंधित बातम्या