सातारा : पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामोशीवाडी, जाखणगाव परिसरात झोपडीच्या आडोशाला उभी केलेली ‘गांजाची बाग’ स्थानिक गुन्हे शाखेने उध्वस्त केली आहे. सुमारे २ लाख ७८ हजार ९०० रुपये किमतीचा ११ किलो १५६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून या प्रकरणात सचिन बापू मदने (वय ३५, रा. रामोशीवाडी, जाखणगाव) या संशयितास ताब्यात घेण्यात आले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रामोशीवाडी येथील सगु वहिणीच्या वस्तीमध्ये एका इसमाने झोपडीशेजारी गांजाच्या झाडांची लागवड करून अवैध विक्रीचा व्यवसाय उभारला आहे.
या माहितीची खातरजमा करण्यासाठी देवकर यांनी पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केले. त्यासोबत पुसेगाव पोलिसांचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमण आणि त्यांचे पथकही या कारवाईत सहभागी झाले.
झोपडीशेजारी नऊ गांजाच्या झाडांची लागवड उघड
छापेमारीदरम्यान संशयित सचिन मदने याने झोपडीच्या लगत एकूण नऊ गांजाच्या झाडांची लागवड केल्याचे समोर आले. अवैधपणे गांजा पिकवून विक्री करण्याचा प्रकार उघड झाल्यानंतर पथकाने संपूर्ण झाडे व तयार स्थितीतील गांजा असा मिळून ११ किलोहून अधिक वजनाचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि पुसेगाव पोलिसांनी केली.
या कारवाईत साबीर मुल्ला, सचिन साळुंखे, मंगेश महाडिक, सनी आवटे, मुनीर मुल्ला, अमित झेंडे, अजय जाधव, हसन तडवी, अमृत कर्पे, अमित सपकाळ, राजू कांबळे, गणेश कापरे, धीरज महाडिक तसेच पुसेगाव पोलिस ठाण्यातील चंद्रहार खाडे, सुधाकर भोसले, योगेश बागल, विपुल भोसले, अमृता चव्हाण, तात्या ढोले, अशोक सरक, रेश्मा भोसले, दर्याबा नरळे यांनी सहभाग घेतला.