वांग मराठवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; ब्बी हंगामातील सिंचनासाठी पाणी सोडले, नागरिकांनी नदीपात्रात न जाण्याच्या सूचना

by Team Satara Today | published on : 13 November 2026


पाटण : वांग मराठवाडी धरणातून गुरुवारी दुपारपासून वांग नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामातील सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी होत असल्याने पाटबंधारे विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला असून, या हंगामातील हे पहिले आवर्तन आहे. पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदीकाठावरील गावांतील नागरिकांनी नदीपात्रात प्रवेश न करण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाने दिल्या आहेत.
मराठवाडी धरणाचे बांधकाम ३० वर्षांनंतर पूर्णत्वाकडे निघाले आहे. २.७३ टीएमसी क्षमतेच्या धरणात आगामी पावसाळ्यात पूर्ण पाणीसाठा करण्यात येईल असा अंदाज आहे. पावसाळ्यात धरणाचे दरवाजे खुले ठेवले होते. मात्र, लाभक्षेत्राला आगामी सहा-सात महिने पुरून उरेल एवढा पाणीसाठा धरणात सध्या शिल्लक आहे.सध्या रब्बी हंगामासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी होऊ लागल्याने पाटबंधारे विभागाने याबाबत गुरुवारपासून कार्यवाही केली. मराठवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात कऱ्हाड व पाटण तालुक्यामध्ये पाणी अडवण्यासाठी वांग नदीवर १० बंधारे बांधले आहेत.
गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास धरणातून पाणी सोडायला सुरुवात झाली. तत्पूर्वी धरणावरील सायरन वाजवून आजूबाजूच्या गावात नदीपात्रात गेलेल्या नागरिकांना सावध करण्यात आले. पुढचे काही दिवस धरणातील विसर्ग कायम राहणार असून, यामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने नागरिकांनी नदीपात्रात प्रवेश करून जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भाजपच्या ऐनवेळी माघारीमुळे खंडाळा साखर कारखाना निवडणुकीत सर्वच २१ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व
पुढील बातमी
एमपीएससी परीक्षेत बाजी मारत आनेवाडीच्या सोनियाची सहायक नगर रचनाकारपदी निवड; जावळी तालुक्याच्या शिरपेच्यात मानाचा तुरा

संबंधित बातम्या