ढेबेवाडी : विभागातील अनेक गावांत भूकंपाचे धक्के, वादळ, पाऊस यामुळे अगोदरच कमकुवत झालेल्या घरांच्या पडझडीचे सत्र गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. महिनाभरात ३१ घरांची पडझड झाल्याची माहिती महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज दिली. नुकसानीचे पंचनामे करून पुढील कार्यवाहीसाठी तहसील कार्यालयाकडे पाठविल्याचेही त्यांनी सांगितले.
परिसरात दगड मातीत बांधकाम केलेल्या घरांची संख्या मोठी आहे. डोंगर परिसरातील गावांत हे प्रमाण तुलनेत अधिक आहे. यातील काही घरांच्या भिंतींना बाहेरून वाळू व सिमेंटने प्लास्टर केले असले, तरी आतील बांधकाम मातीचे असल्याने अशी घरे वरून मजबूत असली, तरी आतून कमकुवत आहेत. काही दिवसांपासून पावसाची रिपरिप असल्याने घरांबाहेरील बाजूच्या भिंती पाण्याने फुगून कोसळण्याच्या घटनेत वाढ झाली आहे.
महिनाभरात विभागातील ३१ घरांची पडझड झाली. यातील पडझडीच्या अनेक घटना रात्री घरात लोक झोपेत असतानाही घडल्या आहेत. बाहेरील बाजूला भिंती कोसळल्याने सुदैवाने जीवितहानी टळल्याचे सांगण्यात आले. ढेबेवाडी, कुठरे मंडलातील वाझोली, कसणी, भरेवाडी, तेटमेवाडी, लोटळेवाडी, जोशीवाडी, महिंद, पाळशी, मंद्रुळकोळे खुर्द, बनपुरी, असवलेवाडी आदी गावांतील १५ घरांच्या भिंतींची, तर तळमावले मंडलातील मानेगाव, कुंभारगाव, शेंडेवाडी, खळे, काढणे, बागलवाडी, शिद्रुकवाडी आदी गावांतील १६ घरांच्या भिंतींची पडझड झाली. धनगरवाडा येथील प्राथमिक शाळेचे छप्पर वादळी पावसात उडाले.
मंडलाधिकारी नागेश निकम, मृदुला कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी पल्लवी मोंडे, रामभाऊ कुंभार, अक्षय लोहार, माधुरी मंगसुळे, स्नेहलता थोरात, तोहिर मुल्ला, बाळासाहेब गायकवाड, आकाश गुरव, राजश्री पवार आदींनी पडझडीचे पंचनामे करून तहसील कार्यालयाकडे पाठविले. पावसात दुरुस्ती करणे शक्य नसल्याने काहींनी प्लॅस्टिक कागद, पत्रे आडवे लावून त्याच घरांत वास्तव्य केले आहे.