भुदरगड : नाधवडे (ता. भुदरगड) येथे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी आज, शनिवारी सुरु असलेल्या मतदानावेळी एकाने ईव्हीएम मशीनची तोडफोड केली. यामुळे मतदान केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी उद्धवसेनेचे ग्राहकसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंत वायदंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज, शनिवारी नाधवडे येथील मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत सुरू होती. दुपारी साडे तीनच्या सुमारास जयवंत वायदंडे हे मतदानासाठी केंद्रावर आले. त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र त्यानंतर केंद्रावर कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांना काही समजण्याआधी त्यांनी ईव्हीएम मशीन उचलून जमिनीवर आपटले. या प्रकारामुळे मशीन बंद पडले आणि मतदान केंद्रावर एकच गोंधळ उडाला.
घटनेनंतर अधिकाऱ्यांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली. विचारणा केल्यावर “मतदान प्रक्रिया बॅलेट पेपरवर घ्यावी” या मागणीसाठी हा प्रकार केल्याचे वायदंडे यांनी सांगितल्याचे समजते. या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी हरेश सुळ यांनी भुदरगड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.मतदान प्रक्रियेत अडथळा आणल्याप्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक योगेश गोरे यांनी दिली.