सातारा : माची पेठ परिसरातील चिकन दुकानांमध्ये भीषण स्फोट होऊन मुजमिल हमीद पालकर या इसमाचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणाचा सातारा शहर पोलीस कसून तपास करत असून गुरुवारी या संदर्भात दोघांना अटक करण्यात आली आहे. शाहीद हमीद पालकर वय 36 व तबरेज गणी पालकर वय 42 दोघेही राहणार गुरुवार परज या दोघांना सातारा शहर पोलिसांनी स्फोटक बाळगल्या प्रकरणी अटक केली आहे.
सातारा शहर पोलीस, बॉम्बशोधक पथक आणि दहशतवाद प्रतिबंधक विभाग या तिन्ही पथकांकडून या स्फोटाचा अन्वयार्थ लावला जात आहे. फटाक्याची दारू जवळ बाळगून त्याचे आपट बार बनवताना मुजमीन पालकर यांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला, अशी माहिती पोलीस तपासात समोर येत आहे. तपासाच्या दृष्टीने पोलिसांनी याबाबत अद्यापही ठोस कारणे दिलेली नाहीत. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून घटनास्थळी ठिय्या देण्यात आला होता. बॉम्बशोधक पथकाने घटनास्थळावरून घेतलेले स्फोटकाचे नमुने या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी नागपूरच्या फॉरेन्सिक लॅबला रवाना केली आहेत. याबाबतची माहिती सातारा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी दिली.
ते म्हणाले या प्रकरणी गुरुवार परज वरील मृताचे चुलत भाऊ शाहीद पालकर व तबरेज पालकर या दोघांना अटक करण्यात आली आहे. धोकादायक स्फोटके जवळ बाळगणे आणि इतरांच्या जीवितास धोका निर्माण करणे असा ठपका त्यांच्यावर ठेवून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना गुरुवारी सातारा न्यायालयासमोर हजर केले असता सात ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या स्फोटामध्ये हरून बागवान व उमर बागवान हे पिता पुत्र दोघे जखमी झाले होते. यापैकी उमर बागवान यांना खाजगी रुग्णालयातून उपचारानंतर घरी सोडण्यात आले. फॉरेन्सिक लॅबने पाठवलेल्या स्फोटक नमुन्यांचा अहवाल नागपूरवरून आल्यानंतरच या प्रकरणाचा आणखी सखोल उलगडा होणार असल्याचे राजेंद्र मस्के यांनी सांगितले आहे.