सातारा : शाहूपुरीतील आंबेदरे रस्त्यावरील घरातून चोरट्याने साडेअकरा तोळे सोन्याचे दागिणे चोरून नेले आहेत. याबाबत आदित्य सुनिल भोसले (रा. शाहूपुरी) याने शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीनुसार आदित्यची आई व आजी यांनी त्यांचे सोन्याचे दागिणे आजोबांच्या कपाटात ठेवले होते. त्यामध्ये २९ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, २६ ग्रॅमच्या दोन बांगड्या, १४ ग्रॅमची बोरमाळ, पाच ग्रॅमची अंगठी, ३९ ग्रॅमचे मंगळसूत्र व सात ग्रॅमची कर्णफुले व वेल अशा दागिण्यांचा समावेश होता. २२ ऑगस्ट २९ ऑगस्ट या कालावधीत ही घटना घडल्याचे त्याने फिर्यादीत म्हटले आहे. ३१ ऑगस्टला गौरी-गणपती सणासाठी दागिणे घालण्यासाठी कपाटात पाहिल्यावर त्यात दागिने नसल्याचे निदर्शनास आले. या दरम्यानच्या कालावधीत आत्याचा मुलगा दोन वेळा घरी आला होता असेही आदित्य याने फिर्यादीत म्हटले आहे.