फलटण : अंगात भूत शिरल्याची भीती दाखवून जादूटोणा केल्याचा बनाव करत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून सौरभ नाना मदने याच्याविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षक कायदा (पोक्सो) महाराष्ट्र जादूटोणाविरोधी कायदा व इतर गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित मदनेची पीडित मुलीच्या कुटुंबीयांशी ओळख झाल्यावर त्याने मुलीच्या अंगात भूत शिरल्याचे सांगून जादूटोणा करत ते काढल्याचा बनाव केला. त्यानंतर जुलै व ऑगस्ट महिन्यात मुलीला एका जुन्या घरात नेले. तेथे आई-वडिलांना मारून टाकण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे, तसेच हा प्रकार कोणालाही सांगू नये, अशी धमकीही दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या घटनेनंतर भीती व बदनामीच्या धास्तीने पीडित मुलगी घरातून निघून गेली. तेथे एका व्यक्तीने तिला एका पोलिस ठाण्यात नेले. तेथील पोलिसांनी तिच्या पालकांशी संपर्क साधल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. यानंतर पीडितेच्या आईने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन शिंदे करीत आहेत.
फलटण तालुक्यातील संतापजनक घटना; भूतबाधेची भीती दाखवून १४ वर्षीय मुलीवर अत्याचार, गंभीर कलमांन्वये एकावर गुन्हा दाखल
by Team Satara Today | published on : 07 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा