सातारा : येथील गोडोली येथील आयुर्वेदिक उद्यानातील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज उर्फ दादा महाराज अभ्यासिकेचा विद्यार्थी धीरज सजगणे याची राज्य राखीव पोलीस दल (SRPF), कोल्हापूर येथे निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याचे वडील मेंढपाळ असून, आई शेतीत काम करते, अशा बिकट परिस्थितीतही त्याने कठोर परिश्रम घेऊन हे यश मिळवले आहे. त्याच्या या निवडीमुळे अभ्यासिका सुरू करण्याचा उद्देश सफल झाल्याचे दिसून येत आहे.
दिवसा काम करून संध्याकाळी अभ्यासिकेत अभ्यास केला
सातारा पालिकेने तीन महिन्यांपूर्वीविद्यार्थ्यांसाठी गोडोली येथील आयुर्वेदिक उद्यानात ही अभ्यासिका सुरू केली. नैसर्गिक आणि शांत वातावरणामुळे या अभ्यासिकेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सुरुवातीच्या तीन महिन्यांतच दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रवेश घेतला. याच अभ्यासिकेतील पिंगळी येथील रहिवासी असलेल्या धीरज सजगणेने दिवसा काम करून संध्याकाळी अभ्यासिका सुरू झाल्यावर अभ्यास सुरू केला. कामामुळे अभ्यासासाठी वेळ मिळत नसल्याने त्याने नगरसेवक ॲड. डी. जी. बनकर यांना विनंती करून अभ्यासिकेची वेळ रात्री १२ वाजेपर्यंत वाढवून घेतली. याचा फायदा होऊन त्याला परीक्षेची तयारी करता आली.
या निवडीबद्दल बोलताना धीरज म्हणाला, "आयुर्वेदिक उद्यानातील शांत आणि उत्तम वातावरणामुळे अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे सोपे झाले. वेळ वाढवून मिळाल्यामुळे मी अधिक चांगला अभ्यास करू शकलो आणि त्यामुळेच आज मला हे यश मिळाले."
मान्यवरांकडून धीरजचे अभिनंदन
धीरजच्या या यशाबद्दल सातारा पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर यांनी त्याचे अभिनंदन केले. यावेळी डॉ. सुयोग वाघ उपस्थित होते. तसेच, खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनीही धीरजचे अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
तीन महिन्यांतच पहिल्या विद्यार्थ्याची निवड
अभ्यासिका सुरू झाल्यानंतर पहिल्या तीन महिन्यांतच पहिल्या विद्यार्थ्याची निवड झाल्याने, या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. भविष्यातही अनेक विद्यार्थी या अभ्यासिकेतून यश संपादन करतील, अशी खात्री व्यक्त केली जात आहे.