सात हजाराची लाच घेताना वनविभागाचा कर्मचारी जाळ्यात; लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कराडमध्ये कारवाई

by Team Satara Today | published on : 02 February 2026


सातारा  :  सागाच्या लाकडाचा वाहतूक परवाना देणे कामी सात हजार रुपयाची लाच मागणाऱ्या कराड वन विभागातील वनपाल संतोष अनंतराव जाधवर (वय 44, राऊंड ऑफिसर वराडे कराड वनपरिक्षेत्र) या कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे .सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून सोमवारी ही कारवाई केली.

सातारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाध्यक्ष राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील पाटील, हवालदार गणेश ताटे,निलेश राजपुरे, सत्यम थोरात,नवनाथ शिंदे या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.

यातील तक्रारदार हे लाकूड व्यावसायिक आहेत .साकुर्डी तालुका कराड येथील शेतकऱ्यांच्या परवानगीने सागाच्या लाकडाची तोड त्यांनी केली होती .या लाकडाच्या वाहतूक परवान्यासाठी वराडे येथील राऊंड ऑफिसर व वनविभागाचे वनपाल संतोष जाधवर यांनी फिर्यादी यांच्याकडे 7600 रुपयाची लाच मागितली .तडजोडीअंती सात हजार रुपये देण्याचे ठरले होते.

तक्रारदारांनी या प्रकरणाची फिर्याद सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली असता जाधवर यांच्या कार्यालय परिसरात चारशे रुपये घनमीटर प्रमाणे 19 घनमीटर चे साडेसात हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ हात पकडण्यात आले. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 नुसार जाधवर यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांना अधिक चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मुख्यालयी राहून वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध न करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई होणार - याशनी नागराजन यांचा आरोग्य यंत्रणेला इशारा; मरळी, ठोसेघरचे वैद्यकीय अधिकारी कार्यमुक्त
पुढील बातमी
वासोळे गावात कण्हेर धरणाचा कालवा फुटून लाखो लिटर पाणी वाया; शेतीचे मोठे नुकसान

संबंधित बातम्या