सातारा : टीईटी परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा शहराध्यक्ष राहुल पवार यांनी राज्य सरकारवर तीव्र टीका करत शिक्षणमंत्र्यांच्या तात्काळ हकालपट्टीची मागणी केली आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित अशा गंभीर प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्र्यांनी पद सोडावे किंवा सरकारने त्यांची तत्काळ हकालपट्टी करावी, अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली.
राहुल पवार म्हणाले की, पेपरफुटीमुळे राज्यातील लाखो उमेदवारांच्या कष्टांवर पाणी फिरले असून, विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला आहे. त्यामुळे राज्य परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांनाही त्वरित पदावरून हटवून संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. पेपरफुटीमागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि पुनर्परीक्षा पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने घेण्यात यावी, अशीही त्यांनी मागणी केली.
"विद्यार्थ्यांच्या भविष्याशी वारंवार खेळ करणाऱ्या सरकारला आता जाब द्यावाच लागेल. दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यभर तीव्र आंदोलन छेडेल. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही दया दाखवली जाणार नाही," असा इशारा राहुल पवार यांनी दिला.