जात पडताळणीसंदर्भातील न्यायप्रविष्ट प्रकरणावर चर्चा थांबवा; अध्यक्षपदाची निवड वैध - आमदार महेश शिंदे

by Team Satara Today | published on : 09 April 2026


सातारा : जिल्हा परिषद अध्यक्ष प्रिया शिंदे यांच्या जात पडताळणीसंदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्यावर माध्यमांमध्ये सुरू असलेली चर्चा थांबवावी, असे आवाहन कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी केले. अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पूर्णपणे नियमांनुसार झाली असून ती वैध असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे म्हणाले की, अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडीनंतर महायुतीतील काही सहकाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. मात्र, या निवडी जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पार पडल्या असून अर्ज छाननीवेळी कोणताही आक्षेप नोंदवला गेला नव्हता. त्यामुळे या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

जात पडताळणीच्या मुद्द्यावर त्यांनी सांगितले की, प्रिया शिंदे यांच्या कुटुंबाची वंशावळ 1812 सालापासून उपलब्ध असून त्यामध्ये कुणबी समाजाच्या नोंदी आहेत. यापूर्वी अशा नोंदींवर अनेकांना ओबीसी दाखले देण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणी माध्यमांमध्ये अनावश्यक चर्चा होऊ नये, असे त्यांनी नमूद केले. कोणालाही आक्षेप असल्यास त्यांनी तो संबंधित प्राधिकरणाकडे मांडावा, असेही त्यांनी सांगितले.

राजकीय पार्श्वभूमीवर बोलताना शिंदे म्हणाले की, जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वीच महायुतीतील काही सदस्यांना महाविकास आघाडीशी युती मान्य नव्हती. त्यामुळे त्यांनी आमच्या बाजूने मतदान केले. कोरेगाव तालुक्यात ओबीसी उमेदवारांना संधी देताना कोणताही अन्याय झाला नसल्याचा दावा त्यांनी केला.

महायुतीतील समन्वयाबाबत त्यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगला समन्वय असून, काही किरकोळ मतभेद असूनही युती एकसंध आहे. “निवडणुकीदरम्यान काही मतभेद झाले असतील, मात्र ते आता मागे टाकून पुढे जाण्याची गरज आहे,” असे ते म्हणाले.

अडीच वर्षांनंतर सभापती पदासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना संधी दिली जाईल, असा विश्वासही महेश शिंदे यांनी व्यक्त केला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राजकीय संघर्ष आता कायदेशीर टप्प्यावर; राष्ट्रवादी सदस्यांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल; कामेश कांबळे, ऋतुजा शिंदे, लता कर्णे यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी
पुढील बातमी
भाजपला विरोध करण्यासाठी काँग्रेस सक्षम - आमदार मलिंदर राजन; काँग्रेसच्या सृजन अभियानाची साताऱ्यातून सुरुवात

संबंधित बातम्या