सातारा : वाई-खंडाळा विधानसभा मतदारसंघातील आमदार मकरंद पाटील यांचे बंधू आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांचा आज विधानभवनात राज्यसभेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून (अजित पवार गट) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
अजितदादा पवार हे परफेक्शनीस्ट आणि आपल्या शब्दाला जागणारे म्हणून सर्वपरिचित आहेत. त्यांनी सातार्यातील एका सभेत राज्यसभेत सातारचा माणूस असेल हा शब्द दिला होता. या शब्दाला जागून आमदार मकरंद पाटील यांचे बंधू आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांचा राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्यात आला. दादांच्या या शब्द पाळण्याच्या वृत्तीची सातारा जिल्ह्यात एकच चर्चा होत आहे.
नितीन पाटील यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले, आमदार मकरंद पाटील, आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अमितदादा कदम, वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य उपाध्यक्ष सागर भोगांवकर, प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, सातारा जिल्हा सरचिटणीस निवास शिंदे आदी उपस्थित होते.