सातारा : सातारा शहरालगतच्या खेड ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी प्रशासनाने मोठी कारवाई करत सरपंच लता फरांदे यांना पदावरून हटविण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत. ग्रामनिधीच्या वापरात गंभीर अनियमितता आणि लाखो रुपयांच्या अपहाराच्या आरोपांनंतर हा निर्णय घेण्यात आला असून जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
खेड ग्रामपंचायतीतील विविध विकासकामांच्या खर्चाबाबत मागील काही महिन्यांपासून तक्रारी होत होत्या. स्थानिक नागरिक आणि काही तक्रारदारांनी निधीच्या गैरवापराबाबत प्रशासनाकडे लेखी निवेदने दिल्यानंतर पंचायत समिती स्तरावर प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली. त्यानंतर स्वतंत्र चौकशी समिती नेमून आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यात आली.
या तपासणीत ग्रामपंचायतीच्या निधीच्या खर्चात गंभीर त्रुटी आढळल्याचे समोर आले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार सुमारे १६ लाख २७ हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचा अपहार आणि अतिरिक्त आर्थिक अनियमितता झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी सरपंच लता फरांदे, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी अतुल जाधव आणि शाखा अभियंता एच. बी. चव्हाण यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
यापूर्वी ग्रामविकास अधिकारी अतुल जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या सुनावणीनंतर विभागीय आयुक्तांनी सरपंचांविरुद्धही कठोर निर्णय घेत पदच्युतीचे आदेश जारी केले.
प्रशासनाच्या आदेशात ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये आवश्यक नियमांचे पालन न झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच कारभारावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याचे निरीक्षणही नोंदविण्यात आले आहे.
खेड ग्रामपंचायतीवर आमदार महेश शिंदे गटाचे वर्चस्व असून लता फरांदे या थेट जनतेतून निवडून आलेल्या पहिल्या सरपंच होत्या. मात्र त्यांच्या कार्यकाळात सातत्याने वाद आणि आरोपांची मालिका सुरू होती. ग्रामपंचायतीच्या कामकाजात कुटुंबीयांचा हस्तक्षेप असल्याच्या चर्चाही वारंवार रंगल्या होत्या. दरम्यान, ग्रामपंचायतीतील सदस्य निखील यादव यांनीही निधीच्या गैरवापराबाबत गंभीर आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या कारवाईमुळे खेडच्या स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.