सातारा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने साताऱ्यात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे उमेदवार अभयसिंह जगताप यांच्या विजयासाठी महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने मैदानात उतरल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शशिकांत शिंदे यांनी सातारा जिल्हा परिषदेत घडलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा असलेल्या सातारा जिल्ह्याचा स्वाभिमान जपण्यासाठी मतदारांनी सजग राहून मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. लोकशाही मूल्यांवर आधारित राजकारणाला बळ देण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शिंदे म्हणाले की, कागदोपत्री संख्याबळ कमी असले तरी महाविकास आघाडीची ताकद जनतेच्या विश्वासात आहे. पैसा आणि सत्तेच्या बळावर नव्हे, तर लोकांच्या पाठिंब्यावर ही निवडणूक लढवली जात असून सातारकर मतदार योग्य निर्णय घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उमेदवार अभयसिंह जगताप यांनीही यावेळी मतदारांशी संवाद साधला. साताऱ्याच्या विकासासाठी पारदर्शक, लोकाभिमुख आणि युवकांना संधी देणारे नेतृत्व उभे करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत राज्य सरकारच्या शेतकरी धोरणावरही टीका करण्यात आली. कर्जमाफीच्या प्रश्नावर सरकारने दिलेली आश्वासने आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यामध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप करण्यात आला. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरसकट कर्जमाफीची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
दरम्यान, साताऱ्यासह इतर जिल्ह्यांमध्येही महाविकास आघाडीच्या बैठका सुरू असून मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचा दावा करण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार यश मिळवतील, असा विश्वास शशिकांत शिंदे आणि अभयसिंह जगताप यांनी व्यक्त केला.