सातारा : सातारा नगरपालिकेतील दोन नगरसेवकांविरोधात दाखल करण्यात आलेल्या अपात्रता अर्जांवरील सुनावणी मंगळवारी प्रांताधिकारी आशिष बारकुल यांच्या समोर पार पडली. निवडणूक शपथपत्रात मालमत्ता व शैक्षणिक माहितीबाबत चुकीची अथवा अपूर्ण माहिती दिल्याचा आरोप या तक्रारींमध्ये करण्यात आला असून, संबंधित बाजूंनी सविस्तर उत्तर सादर करण्यासाठी मुदत मागितल्याने पुढील सुनावणी 14 जुलै रोजी होणार आहे.
नगरसेवक निशांत पाटील यांच्याविरोधात सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी तक्रार दाखल केली असून, निवडणूक शपथपत्रात मालमत्तेची संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर नगरसेविका मुक्ता लेवे यांच्याविरोधात सामाजिक कार्यकर्ते अमित शिंदे यांनी मालमत्ता आणि शैक्षणिक पात्रतेबाबत चुकीची माहिती सादर केल्याचा दावा केला आहे.
या दोन्ही प्रकरणांची चौकशी करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी प्रांताधिकारी आशिष बारकुल यांना दिले आहेत. सुनावणीदरम्यान निशांत पाटील यांच्या वतीने ऍड. ताहीर मणेर आणि ऍड. सिद्धार्थ पाटील यांनी बाजू मांडली, तर तक्रारदार सुशांत मोरे स्वतः उपस्थित होते. मुक्ता लेवे यांच्या वतीने ऍड. उमेश शिर्के यांनी काम पाहिले. तक्रारदार अमित शिंदे हे ऍड. सागर निगडकर व ऍड. कमलेश ताटे यांच्यासह उपस्थित होते.
तक्रारदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या प्रती मिळाव्यात तसेच त्यावर सविस्तर उत्तर देण्यासाठी वेळ द्यावा, अशी मागणी संबंधित नगरसेवकांच्या वकिलांनी केली. त्यानुसार प्रांताधिकारी बारकुल यांनी दोन्ही बाजूंची मागणी ग्राह्य धरून पुढील सुनावणी 14 जुलै रोजी ठेवण्याचा निर्णय दिला.
सुनावणी दरम्यान सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनुपस्थित असल्याबाबत प्रांताधिकार्यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा होती. संवेदनशील स्वरूपाच्या या प्रकरणामुळे प्रांत कार्यालय परिसरात पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.