शोषितांसाठी चळवळ उभारण्याचे डॉ. सोनझरिया मिंझ यांचे आवाहन; “उरलेल्यांनी संघर्षासाठी एकत्र यावे”; विद्रोही संमेलनातून व्यवस्थेविरोधात संताप;

by Team Satara Today | published on : 09 May 2026


सातारा  : देशातील सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस अधिक धोकादायक होत असून सामान्य माणसाच्या अस्तित्वावरच संकट निर्माण झाले आहे. अशा काळात परिवर्तनवादी शक्तींनी जनतेमध्ये उतरून नव्या संघर्षाची दिशा उभी करावी, असा तीव्र सूर साताऱ्यात सुरू झालेल्या १५ व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात उमटला.

विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्रच्या वतीने कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना शाहीर संभाजी भगत यांनी सध्याच्या व्यवस्थेवर जोरदार टीका केली. “देशातील लोकशाही संस्था कमकुवत होत आहेत. भीती, दडपशाही आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. विचार मांडणाऱ्यांवर हल्ले होत असताना समाजाने शांत राहणे धोकादायक आहे,” असे ते म्हणाले.

प्रतिकाराची नवी चळवळ उभारली पाहिजे

“दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्या समाजाला दिसल्या, पण सामान्य कार्यकर्त्यांचे दैनंदिन संघर्ष आणि होणारे अन्याय कुणाच्या लक्षात येत नाहीत. त्यामुळे आता उरलेल्यांनी तरी एकत्र येऊन प्रतिकाराची नवी चळवळ उभारली पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले. “आपली वैचारिक प्रतीके आणि परिवर्तनवादी मूल्ये जपली नाहीत, तर अंधार अधिक गडद होईल,” असा इशाराही त्यांनी दिला.

आदिवासी समाज अजूनही मुख्य प्रवाहापासून दूर असल्याची खंत 

संमेलनाच्या उद्घाटक डॉ. सोनाझरिया मिंझ यांनी महाराष्ट्राच्या परिवर्तनवादी परंपरेचा गौरव करत आदिवासी समाज अजूनही मुख्य प्रवाहापासून दूर असल्याची खंत व्यक्त केली. “या मातीत क्रांतीची बीजे आहेत. शोषितांसाठी नव्याने लढाई लढून परिवर्तनाची दिशा ठरवावी लागेल सामाजिक अभिसरणासाठी या चळवळी महत्त्वाच्या आहेत .सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे सामाजिक परिवर्तनाची दिशा मिळाली,” असे त्या म्हणाल्या.

माजी अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी शेतकरी प्रश्न, आत्महत्या आणि जमिनींच्या संपादनावर भाष्य करत “लोकशाहीवरील दबाव वाढत असून जनआंदोलनांची ताकद कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत,” असा आरोप केला. उद्घाटन सत्राला विविध साहित्यिक, कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
26 मार्च डेडलाईन; मात्र महामार्ग अद्याप अपूर्णावस्थेतच
पुढील बातमी
रिक्षाचा ताबा सुटून झालेल्या भीषण अपघातात महिलेचा मृत्यू; दोन वर्षीय मुलगा जखमी; रिक्षा चालकावर गुन्हा दाखल

संबंधित बातम्या