सातारा : साताऱ्यात अजंठा चौक येथील हॉटेल प्रीतीनजीक असलेली भागीदारीतील ट्राडेन्ट फिटनेस नावाची जिम परस्पर विक्री केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सोनाली जयकुमारण (वय ४३, रा.तामजाईनगर. मूळ रा. तामिळनाडू) यांनी फिर्याद दिल्याने सुरज रमेश फडतरे (रा. सदरबझार, सातारा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,मे २०२५ मध्ये पहिल्या आठवड्यात फिर्यादी सोनाली आणि संशयित आरोपी सुरज फडतरे यांनी दोघांत मिळून अजंठा चौक नजीक ट्राडेन्ट फिटनेस नावाने जिम सुरू केली. याबाबतच्या चर्चा आणि व्यवहार सोनाली जयकुमारण यांच्या राहत्या घरी वेळोवेळी करण्यात आले. सोनाली यांनी भागीदारीत चालू केलेल्या जिमसाठी ११ लाख ४५ हजार रुपये गुंतवले होते.
त्यानंतर सुरज याने विश्वास संपादन करून फिर्यादीकडून आर्थिक नड असल्याचे सांगून पैश्याची मागणी केली. यावेळी पैसे नसल्याने सोनाली यांनी सुरज याच्या मागणीवरून घरातील ७ तोळे सोने गहाण ठेवण्यासाठी दिले. याची किंमत ५ लाख रुपये मिळाल्याने ते ७ दिवसांत परत करण्याचे आश्वासन दिले. मात्र आरोपीने हे सोने परत न केल्याने विचारणा केली. यावेळी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.
यादरम्यान सुरज याने परस्पर जिमचा व्यवहार करून जिम दुसऱ्या व्यक्तीस विकून टाकत फिर्यादीची फसवणूक केली. आपली फसवणूक झाली आहे याची खात्री पटल्याने सोनाली यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात सुरज फडतरे याच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल केला. शाहूपुरी पोलिसांनी या अर्जाची चौकशी करून सुरज रमेश फडतरे यांच्या विरोधात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के करत आहे.