सातारा : सातारा जिल्ह्यात येत्या 27 ऑगस्ट रोजी श्री गणरायाचे आगमन होत आहे. या गणरायाच्या आगमन सोहळ्यासाठी सातारा शहरातील गणेशोत्सव मंडळांना वीज वितरण, नगरपालिका, धर्मादाय आयुक्त तसेच इतर सर्व परवानग्या एक खिडकी योजनेअंतर्गत मिळाव्यात. त्यासाठी नगरपालिकेने एक खिडकी ही योजना प्रभावीपणे राबवावी तसेच शेवटच्या चार दिवसांमध्ये गणेशोत्सव मंडळांना डॉल्बी चे चार बेस व चार टॉप लावण्याची परवानगी देण्यात यावी, अशी आग्रहाची मागणी गणेशोत्सव मंडळांच्या वतीने करण्यात आली.
सातारा जिल्हा पोलीस प्रशासन, नगरपालिका, महाराष्ट्र वीज वितरण, प्रादेशिक परिवहन विभाग व महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव मंडळांच्या अडीअडचणीच्या संदर्भाने येथील शाहू कला मंदिरामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, प्रांत आशिष बारकुल, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे, सातारा शहर वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव, वीज वितरण कंपनीचे शहर अभियंता आशिष नवाळे इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या बैठकीमध्ये गणेशोत्सव मंडळ समन्वय समितीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या गणेशोत्सवाच्या मानक चित्राचे प्रकाशन करण्यात आले. बैठकीत कार्यकर्त्यांनी सूचनांचा अक्षरशः पाऊस पाडला. गणेशोत्सव मंडळांसाठी कायमस्वरूपी विसर्जन तळे असावे, गणपती मंडळांना वीज वितरण कंपनीने धार्मिक उपक्रमांतर्गत सहा रुपये प्रति युनिटने वीजदर आकारावा, सार्वजनिक बांधकाम विभाग व सातारा नगरपालिकेने गणेशोत्सवापूर्वी सातारा शहरातील खड्डे तातडीने भरून घ्यावेत, सातारा शहरातील वर्दळीचे चौक रस्ते शाळा तसेच महत्त्वाचे परिसर सीसीटीव्ही कॅमेर्याने युक्त असावेत व तेथील वाहतुकीचे नियमन करून तेथे नो-पार्किंग झोन करण्यात यावा, मंडळ रजिस्टर झाल्यानंतर पुन्हा पोलीस विभागाने धर्मादाय आयुक्त कार्यालयाची परवानगी मागू नये, तसेच सातारा नगरपालिकेने एक खिडकी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. त्यासाठी सर्व विभागाचे अधिकारी विशेषत: धर्मादाय आयुक्त, वीज वितरण कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, जागा मालकाचा ना-हरकत दाखला, असे सर्व प्रतिनिधी सातारा नगरपालिकेचा सभागृहात एकाच ठिकाणी बसवण्यात यावेत. जेणेकरून सर्व मंडळांना परवानगी घेणे सोपे होईल, अशा सूचना यावेळी कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे मांडल्या.
सातारा शहरातील विसर्जन मिरवणुकीमध्ये समन्वय असावा, दोन्ही मंडळे एकमेकांसमोर आल्यास वाहतूक अडथळा येऊ नये, विसर्जन मिरवणुकांच्या दिवशी मिरवणुकीचा मार्ग नो व्हेईकल झोन करण्यात यावा, अशा मागण्या होत असताना डॉल्बी साठी चार बेस व चार टॉप शेवटच्या पाच दिवसासाठी परवानगी मिळावी व सातारा नगरपालिकेने तालीम संघ मैदानावर कायमस्वरूपी विसर्जन त्याला तयार करावा, अशी आग्रही मागणी माजी नगराध्यक्ष अशोक मोने यांनी मांडली.
श्रीकांत शेटे म्हणाले, एमएसईबी च्या माध्यमातून जे डिपॉझिट घेतले जाते ते दोन-दोन वर्ष परत मिळत नाही. तसेच ध्वनीक्षेपणास 12 वाजेपर्यंत परवानगी मिळावी. अनामत रकमा त्याच ठेवून वीज वितरण ने आम्हाला परवानगी द्याव्यात, सातत्याने पुन्हा डिपॉझिट मागण्यात येऊ नये, तसेच राजवाडा चौपाटी विसर्जन मिरवणूक होईपर्यंत रात्री दोन वाजेपर्यंत सुरू ठेवावी, ओपन गटारे बंदिस्त करावीत, सातारा शहरातील खड्ड्यांकडे गांभीर्याने पाहून ते दुरुस्त केले जावेत आणि विसर्जन मिरवणूक मार्गावरील हायमास्ट दिवे कार्यान्वित करण्यात यावेत, अशा मागण्या करण्यात आल्या.
माजी शिवसेनाप्रमुख नरेंद्र पाटील, चंद्रशेखर घोडके, अभिजीत बारटक्के, धनंजय शिंदे, पंकज चव्हाण, सुनील कालेकर, अभिजीत साळुंखे आदी मान्यवरांनी या बैठकीत सूचना मांडल्या.
सातारा नगरपालिकेच्या वतीने मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी सर्व सूचनांचे स्वागत केले. सातारा नगरपालिकेच्या वतीने जास्तीत जास्त सुविधा देण्याच्या दृष्टीने आणि हा गणेशोत्सव सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने सहकार्य होईल, असे आश्वासन देत सातारा नगरपालिकेने केलेल्या तयारीची माहिती दिली. नवरात्रोत्सव आणि गणेशोत्सव या दोन्ही महोत्सवासाठी सातारा नगरपालिका विसर्जन तलाव, सीसीटीव्ही कॅमेरे, लाईफ-गार्ड, पाण्याचे लायनर, क्रेन, लोखंडी हाऊस, सीसीटीव्ही कॅमेरे, व्हिडिओ चित्रीकरण या सर्व उपक्रमासाठी 54 लाख रुपये पालिका खर्च करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने म्हणाले, सातारकरांनी कायद्याच्या चौकटीत राहून गणेशोत्सवाच्या दृष्टीने सर्व कायदेशीर बाबींचे पालन करावे. तसेच हा उत्सव निर्विघ्नपणे पार पडेल यासाठी सर्वांनी समन्वयाने काळजी घ्यावी आणि महोत्सवाचा आनंद द्विगुणीत करावा, असे आवाहन त्यांनी केले.
गणपती बाप्पांच्या आगमन मिरवणूकीसाठी यंदा केवळ १६ व २३ ऑगस्ट या दोन दिवसांचीच परवानगी राहील. इतरवेळी आगमन मिरवणूक निघाली व त्याबाबत तक्रार आली तर पोलीस गुन्हे दाखल करणार. तसेच डॉल्बीबाबत सर्वोच्च न्यायालयाचे जे आदेश आहेत त्याचे सर्वांनी पालन करावे, अशी भूमिका गणेशोत्सव २०२५ च्या झालेल्या बैठकीत पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी स्पष्ट केली.