सातारा : कोरेगाव शहरासह तालुका आणि विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी खऱ्या आणि निष्ठावंत शिवसैनिकांना बळ दिले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
सातारा येथील शासकीय विश्रामगृहावर कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंत्री देसाई यांची भेट घेतली. यावेळी कोरेगावकर नागरिकांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे, कराडचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, संदीप केंजळे, विजय पोपटराव जगदाळे, माजी नगरसेवक मुन्नाभाई काझी आदी उपस्थित होते.
यावेळी राजाभाऊ बर्गे यांनी सांगितले की, कोरेगाव तालुका हा शिवसेनेची विचारधारा मानणारा असून सर्वसामान्य जनतेला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याबद्दल विशेष प्रेम आहे. शिवसेना सत्तेत नसतानाही तालुक्यात पक्षाचा विस्तार झाला होता. मधल्या काळात पक्ष काहीसा मागे पडला असला, तरी आता पुन्हा नव्या जोमाने संघटन केले जाणार आहे. प्रत्येक गाव, वाडी-वस्तीवर शिवसेनेचा विस्तार करून युवा पिढीला पक्षाच्या विचारधारेत सहभागी करून घेतले जाईल. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये प्रत्येक ठिकाणी भगवा झेंडा फडकविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री देसाई यांनी कोरेगाव शहर, तालुका आणि विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा बारकाईने आढावा घेतला. येऊ घातलेल्या नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राजाभाऊ बर्गे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. कराड शहराप्रमाणेच कोरेगावमध्येही निवडणुकीचे राजकारण रंगले, तरी जनतेच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा विजय निश्चित होऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच कराडमध्ये जसे राजेंद्रसिंह यादव यांना लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून जनतेने निवडून दिले, त्याच धर्तीवर कोरेगाव नगरपंचायतीची निवडणूक लढविण्याचा सल्ला त्यांनी दिला.
शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे यांनी तालुका व मतदारसंघातील पक्ष संघटनेचा आढावा घेत आगामी काळात संघटन बळकटीसाठी ठोस प्रयत्न केले जातील, असे सांगितले.
या बैठकीत शिवसेना पक्षवाढ, संघटन मजबूत करणे आणि आगामी निवडणुकांच्या रणनीतीबाबत सकारात्मक व सविस्तर चर्चा झाली.