सातारा : मंदिरांचे सरकारीकरण, मंदिरांची सुरक्षा, वक्फ बोर्डकडून होणारे अतिक्रमण यांसह विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’ २२ मार्च रोजी साताऱ्यात आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला राज्यभरातील १००० हून अधिक मंदिरांचे विश्वस्त, पुरोहित, अभ्यासक आणि मंदिर रक्षणासाठी कार्यरत प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.याची माहिती मंदिरण्यास परिषदेचे राज्य संघटक संजय जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले, महाराष्ट्र मंदिर महासंघ, मुंबई येथील जिवदानी देवी मंदिर संस्था, भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर देवस्थान आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. परिषद साताऱ्यातील स्वराज मंगल कार्यालय, कोरेगाव रस्ता येथे होणार आहे .मंदिरांच्या प्रश्नांवर व्यापक चर्चा संजय जोशी यांनी सांगितले की, लाखो वर्षांची परंपरा असलेली हिंदू मंदिरे सध्या विविध समस्यांना सामोरे जात आहेत. मंदिरांचे सरकारीकरण, सरकारी ताब्यातील मंदिरांमधील भ्रष्टाचार, मंदिरांची भूमी बळकावणे, प्रसादात भेसळ, तसेच वक्फ कायद्याच्या माध्यमातून मंदिरांच्या जमिनींवर अतिक्रमण अशा प्रश्नांवर परिषदेत चर्चा होणार आहे. मंदिरांचे संघटन मजबूत करून हे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या परिषदेतून केला जाणार आहे.
या परिषदेला राज्याचे फलोत्पादनमंत्री भरतसेठ गोगावले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, साताऱ्याचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, जैन मंदिराचे प्रतिनिधी गिरीश शहा, लेखक-अभ्यासक संदीप सिंह, ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ महाराज, देहू-आळंदी येथील मंदिरांचे विश्वस्त, अष्टविनायक मंदिरांचे विश्वस्त तसेच विविध संतपीठांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
परिषदेत चर्चिले जाणारे प्रमुख विषय
परिषदेत मंदिरांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आहेत. त्यामध्ये मंदिरांची सुरक्षा व्यवस्था, मंदिरांना सनातन धर्मप्रचाराची केंद्रे बनवणे, मंदिरांचे सरकारीकरण मुक्त करणे, वक्फ कायद्यामुळे होणाऱ्या अतिक्रमणांवर उपाय तीर्थक्षेत्र परिसरात मद्य-मांस बंदी दुर्लक्षित मंदिरांचा जीर्णोद्धारयांसारख्या विषयांवर मार्गदर्शन आणि चर्चा होणार आहे.ही परिषद केवळ निमंत्रितांसाठी असून सहभागी होण्यासाठी ७०२०३८३२६४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र मंदिर महासंघाने केले आहे.