कॉकरोच जनता पार्टीचे सौरव दासच्या घराचा पत्ता लीक करणाऱ्यांना न्यायालयाचा दणका; समन्स बजावले, सोशल मीडियावरील व्हिडिओही हटवले

by Team Satara Today | published on : 24 August 2026


दिल्ली  :  कॉकरोच जनता पार्टीचे सौरव दास यांनी दाखल केलेल्या याचिकेची दखल घेत दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी कडक पावले उचलली आहेत. दास यांच्या दिल्लीतील भाड्याच्या घराचा पत्ता आणि वैयक्तिक माहिती सार्वजनिक केल्याच्या आरोपावरून न्यायालयाने राजकीय विश्लेषक अभिजित अय्यर मित्रा, 'द पॅम्पलेट' आणि 'लॉ बीट' या डिजिटल माध्यमांसह संबंधित पक्षांना समन्स बजावले आहे. घराचा पत्ता लीक झाल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगत दास यांनी दोन दिवसांपूर्वीच न्यायालयात धाव घेतली होती.

न्यायमूर्ती सचिन दत्ता यांनी अंतरिम स्थगितीच्या याचिकेवर प्रतिवादींना नोटीस बजावली आणि दोन आठवड्यांनंतर सुनावणीसाठी प्रकरण सूचीबद्ध केले. सुनावणीदरम्यान, सौरव दास यांचा पत्ता सार्वजनिक करणारे ट्वीट्स काढून टाकण्यात आल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. खंडपीठाने विचारले, "एक्स च्या वतीने कोण हजर आहे? या लिंक्स काढून टाकण्यात आल्या आहेत का? या लिंक्स आता सक्रिय नाहीत का?" यावेळी एक्सच्या वतीने या लिंक्स काढून टाकण्यात आल्याची माहिती दिली. या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ सप्टेंबर रोजी होईल.

सौरव दास यांनी आपल्या गोपनीयतेचा भंग झाल्याचा आरोप करत २ कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. तसेच, मित्रा आणि इतरांना आपला निवासी पत्ता व इतर माहिती पुढे उघड करण्यापासून रोखावे आणि अशी माहिती असलेले व्हिडीओ काढून टाकावेत, अशी विनंतीही त्यांनी न्यायालयाला केली आहे.

सौरव दास यांनी याचिकेत आणखी काय म्हटले आहे?

दास यांनी याचिकेत म्हटले आहे की, ते २०२५ च्या सुरुवातीपासून ग्रेटर कैलाश-१ मध्ये भाड्याच्या घरात राहत आहेत. काही लोकांनी त्यांच्या घरात बेकायदेशीरपणे प्रवेश केला, तिथे इतर लोकही राहतात. त्यांच्या घरातील फुटेज रेकॉर्ड करून ५ ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असा आरोप त्यांनी याचिकेत केला आहे. ज्या व्हिडिओमध्ये त्यांचा पत्ता उघड करण्यात आला होता, त्याला २१ लाख व्ह्यूज मिळाले आणि १० ऑगस्ट रोजी तो पुन्हा अपलोड करण्यात आला. मित्रा यांनी एका कार्यक्रमात त्यांच्या घराचा पत्ता उघड केला आणि त्याचे मासिक भाडे ७ लाख रुपये असल्याचा खोटा दावा केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कॉलेजमध्ये शिक्षण सुरू असतानाच नॅशनल हायवे प्रोजेक्ट्समध्ये इंटर्नशिप करण्याची संधी; दरमहिना २० हजार पगार, नोंदणी सुरू
पुढील बातमी
बड्या उद्योगपतींना कर्जाच्या बाबतीत सूट; शेतकऱ्यांनाही न्याय मिळावा - शरद पवार, द्राक्ष परिसंवाद आणि ६६व्या वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन

संबंधित बातम्या