विचारभ्रष्टतेचे मूळ राजकीय, शैक्षणिक धोरणांतच नव्हे तर मध्यमवर्गीयांच्या वैचारिक उदासिनतेतही ; परिसंवादात खंत व्यक्त

by Team Satara Today | published on : 04 January 2026


स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा) : विचारभ्रष्टतेचे मूळ राजकीय, शैक्षणिक धोरणांतच नव्हे तर मध्यमवर्गीयांच्या वैचारिक उदासिनतेतही आहे, अशी खंत 'आजच्या मराठी समाजाची विचारभ्रष्टता आणि वैचारिक साहित्याची निर्मिती' या परिसंवादात व्यक्त करण्यात आली. 

९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज (दि. ३) आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी, पर्यावरण मित्र शाळीग्राम निकम, प्रसिद्ध वक्ता यशवंत पाटणे, लोककला साहित्य, संस्कृतीचे अभ्यासक डॉ. संभाजी पाटील, ॲड. धनंजय वंजारी यांचा सहभाग होता. प्रशांत कदम यांनी संवादक म्हणून तर हणमंत पाटील यांनी निवेदक म्हणून भूमिका बजावली.

'भ्रष्टाचार राजकारणाची आई आणि लाठी राजकारणाचा बाप' या जयवंत दळवी यांच्या 'पुरुष'  नाटकातील वाक्याचा संदर्भ देत अॅड. धनंजय वंजारी म्हणाले, जात हा स्वनियोजित तुरुंग आहे. विवेकप्रचूर बुद्धीची कास धरता आली नाही तर काहीही होणार नाही. 

आज वैचारिक साहित्य उपलब्ध होण्याची संधी वाढलेली असतानाही महाराष्ट्र विचार भ्रष्टतेकडे का वळतोय या अनुषंगाने विचार करताना हेरंब कुलकर्णी यांनी चार मुद्द्यांना प्रामुख्याने दोषी मानले. पहिला आरोप राजकीय व्यवस्थेवर केला. महाराष्ट्रात वैचारिक जागरण होत नाहीये अशी खंत करून त्यांनी शिक्षण व्यवस्थेला दुसऱ्या क्रमांकाचे दोषी ठरवले. ही व्यवस्था विद्यार्थ्यांना विचार करायला शिकवत नाही तर ती रेडीमेड विचार देते, असा आरोप त्यांनी केला. मध्यवर्ग वर्ग फक्त मनोरंजनच मागतो असे सांगून तिसऱ्या क्रमांकावर मध्यमवर्गीयांच्या अभिरुचीला दोषी ठरविले. साहित्य व्यवहारातील सगळ्या संस्थांचे निकष पातळ झाले आहेत. शब्द फार स्वस्त झाले आहेत असे म्हणत त्यांनी चौथा दोष उधृत केला.  

लोककल्याणाची साधने ज्यांच्या हातात असतात, त्यांना भूतकाळाचे भान असावे लागते, वर्तमानाची जाण असावी लागते आणि भविष्याची दृष्टी असावी लागते. वैचारिक साहित्य हे अमृताचे फळ देणारे झाड आहे. अशी झाडे वाढावीत अशी अपेक्षा यशवंत पाटणे यांनी व्यक्त केली.

जोपर्यंत उपाशी पोटाचे प्रश्न जिवंत आहेत, सामाजिक जाणिवांचा खून होत आहे तोपर्यंत साहित्यिकाची लेखणी शस्त्र बनून उभी रहायला हवी, असे परखड मत शाळीग्राम निकम यांनी मांडले. 

पत्रकारीता आणि प्रसारमाध्यमे ही उद्योगपतींच्या आश्रयाला विश्रांती घेत आहे ही वैचारिक भ्रष्टताच आहे, असा घणाघाती आरोप डॉ. संभाजी पाटील यांनी केला.

निमंत्रितांचा सत्कार अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरैय्या स्वामी, संमेलनाचे कार्याध्यक्ष सुनिताराजे पवार यांनी केला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महाराष्ट्राची हास्य जत्रा’ अन हास्यकल्लोळ ! टाळ्यांचा कडकडाट, सातारकरांनी कलाकारांना भरभरून दाद दिली
पुढील बातमी
मराठी भाषा जगण्याची आणि आधुनिकतेची जोड असलेली भाषा व्हावी : ‘अभिजात दर्जा नंतरची मराठी : संधी आणि आव्हाने’ परिचर्चेत उमटला सूर

संबंधित बातम्या