सातारा : सातारा शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या आणि सातारकर यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या कस्तुरबा रुग्णालयाच्या मोडकळीस आलेल्या इमारतीवर पालिकेने हातोडा टाकत त्या वास्तूची संरचना जमीनदोस्त केली. या परिसरात अवैध धंदे खोपवल्याचे स्पष्टीकरण नगराध्यक्षांनी देत त्या जागेचा योग्य वापर आगामी विकास कामांसाठी केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. अनेक दशकांपासून राजवाडा परिसरात उभे असलेल्या या या इमारतीचा ढाचा जमीनदोस्त करण्यात आल्याने कस्तुरबाच्या जुन्या आठवणी आता इतिहासजमा झाल्या आहेत.
कस्तुरबा रुग्णालयाची ही इमारत एकेकाळी सातारकरांच्या आरोग्याचे मंदिर होती. मात्र, प्रशासकीय दुर्लक्ष आणि देखभालीअभावी या देखण्या वास्तूची रया गेली होती. रुग्णालयाचे कामकाज नवीन इमारतीत हलवल्यानंतर, या जुन्या वास्तूचा ताबा मद्यपी आणि जुगारींनी घेतला होता. खिडक्यांचे गज, दरवाजे आणि छताची पडझड झाल्याने ही जागा भयावह बनली होती. इतकेच नव्हे तर, या ओसाड इमारतीत आत्महत्येसारख्या घटनाही घडल्याने परिसरात दहशत पसरली होती .प्रसार माध्यमांनी या इमारतीच्या दुरावस्थेबाबत आणि येथे जाणाऱ्या अवैध धंद्याबाबत वेळोवेळी आवाज उठवला होता.
नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी तक्रारींची दखल घेत नुकतीच या जागेची पाहणी केली होती. परिस्थितीची दाहकता आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेता, त्यांनी ही इमारत तत्काळ पाडण्याचे आदेश दिले. मजूर संस्थेची तांत्रिक परवानगी मिळताच सोमवारी सकाळी पालिकेचे पथक या ठिकाणी धडकले आणि काही तासांतच अवैध व्यवसायांचे हे केंद्र भुईसपाट करण्यात आले.
पालिकेच्या मालकीच्या जागांचा गैरवापर खपवून घेतला जाणार नाही
कस्तुरबा रुग्णालयाची जुनी इमारत केवळ मोडकळीस आली नव्हती, तर ती गुन्हेगारी कारवायांचे केंद्र झाली होती. दिवसाढवळ्या तेथून जाणे महिला आणि नागरिकांना जिकीरीचे बनले होते. पालिकेच्या मालकीच्या जागांचा गैरवापर खपवून घेतला जाणार नाही. अशा प्रकारे कुठेही अवैध धंदे सुरू असल्याचे आढळल्यास कोणाचाही मुलाहिजा न ठेवता कठोर कारवाई केली जाईल.
अमोल मोहिते, नगराध्यक्ष, सातारा