मुंबई : देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत बांधकाम सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कारण, थेट 13 व्या मजल्यावरील बांधकाम क्रेन कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. या घटनेत एका 20 वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झालेत.
मिरा रोडच्या 'जेपी नॉर्थ' परिसरात 13 व्या मजल्यावरील बांधकाम क्रेन कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. या भीषण अपघातात एक जण गंभीर जखमी आहे. तर खाली उभ्या असलेल्या अनेक वाहनांचे प्रचंड नुकसान झालं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू झालं आहे. स्थानिक नागरिकांकडून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. बांधकामाकरता क्रेनची उंची वाढवण्याचं काम सुरू होतं. पण सुरक्षा उपायांची योग्य काळजी न घेतल्यानं ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
घटनास्थळापासून दूर राहण्याचं आवाहन- बांधकाम कामासाठी वापरली जाणारी मोठी क्रेन अचानक सोसायटीच्या कोसळल्यामुळे आवारात उभ्या असलेल्या अनेक गाड्यांचं मोठं नुकसान झालं. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची अनेक पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. त्यांनी बचावकार्य सुरू केले. ढिगाऱ्याखाली कोणी अडकले असण्याची शक्यता असल्यानं बचावकार्य अद्याप सुरू आहे. पोलीस आणि संबंधित विभागांचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यांनी अपघाताच्या कारणांचा तपास सुरू केला आहे. प्रशासनानं नागरिकांना घटनास्थळापासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे.