दिल्लीत हाय-व्होल्टेज ड्रामा; ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांनी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण, राहुल, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात

by Team Satara Today | published on : 06 October 2026


नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत आज राजकीय वातावरण चांगलेच तापले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत ‘इंडिया’  आघाडीच्या खासदारांनी पुकारलेल्या आंदोलनाला मंगळवारी दुपारी हिंसक वळण आले. संसद भवनापासून सुरू झालेल्या या निषेध मोर्चादरम्यान दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई करत काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक विरोधी खासदारांना ताब्यात घेतले आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मंगळवारी सकाळी विरोधी खासदारांनी संसदेतून मोर्चा काढला. दुपारी १२:१५ च्या सुमारास हा मोर्चा आकाशवाणी भवनाजवळ पोहोचला आणि त्याचे रूपांतर थेट धरणे आंदोलनात झाले. पीटीआयच्या माहितीनुसार, पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता राहुल गांधी आणि प्रियांका गांधी आकाशवाणी भवन परिसरात दाखल झाले व त्यांनी मध्यवर्ती भागातच ठिय्या आंदोलन सुरू केले. या दरम्यान पोलिसांनी आकाशवाणी भवनाबाहेर गोंधळ घालणाऱ्या बहुतांश विरोधी खासदारांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली, ज्यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला.
"पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांना मदत केली": राहुल गांधींचा थेट आरोप
आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. राहुल गांधी म्हणाले, "आम्हाला निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन आमचे म्हणणे मांडायचे होते, मात्र पोलिसांनी आम्हाला अडवले. मुख्य निवडणूक आयुक्तांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना देश हायजॅक करण्यात मदत केली आहे."
भाजपचा जोरदार पलटवार: 'ही घुसखोरीची विकृती'
राहुल आणि प्रियांका गांधी यांच्या आकाशवाणी भवनातील आंदोलनावर भारतीय जनता पक्षाने (BJP) तीव्र आक्षेप घेतला आहे. भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी या घटनेला 'परिसरात जबरदस्तीने केलेली घुसखोरी' म्हटले आहे.
त्रिवेदी यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हटले की, "काँग्रेस पक्ष गेल्या १२ वर्षांपासून लोकशाहीच्या प्रत्येक महत्त्वाच्या स्तंभावर आणि घटनात्मक संस्थांवर बिनबुडाचे आरोप करत आहे. विरोधी पक्षांना आपला पराभव पचवता येत नसल्यानेच असा गोंधळ निर्माण केला जात आहे."

सध्या आकाशवाणी भवन आणि संसद परिसराला छावणीचे स्वरूप आले असून, अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पुणे विभाग शिक्षक मतदार संघाकरिता निवडणूक वडणूक निरीक्षक म्हणून डॉ. हनमनलू तुम्मोड यांची नियुक्ती

संबंधित बातम्या