सातारा : शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने पुन्हा एकदा आपली धडाकेबाज कामगिरी सिद्ध केली आहे. अवघ्या काही दिवसांत घरफोडी प्रकरण उघडकीस आणत मुंबईतून संशयित आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्याकडून तब्बल ९,२०,००० रुपयांचे १३.५ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
अटक केलेल्या आरोपीचे नाव ऋषीकेश पांडुरंग देटे (वय २९, रा. कोपरखैरने, नवी मुंबई) असे असून, चौकशीदरम्यान सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर शेवटी त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दि. ४ सप्टेंबर २०२५ रोजी शाहुपुरी पोलीस ठाण्यात घरफोडीची तक्रार दाखल झाली होती. भारतीय न्याय संहितेच्या कलम अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.
गुन्ह्याच्या तपासादरम्यान गुन्हे प्रकटीकरण शाखेला गुप्त बातमीदारामार्फत आरोपी मुंबईत असल्याची खबर मिळाली. तात्काळ सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले गेले आणि चौकशीतून चोरी गेलेले दागिने परत मिळाले.
या कारवाईस पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांचे मार्गदर्शन लाभले. पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक ढेरे, ढमाळ, गोवेकर तसेच अंमलदार सुरेश घोडके, मनोज मदने, निलेश काटकर, जोतीराम पवार, महेश बनकर, अनय साबळे, सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे, संग्राम फडतरे यांनी उल्लेखनीय परिश्रम घेतले.