डॉल्बी लावून उत्तरेतील संस्कृती महाराष्ट्रात आणतोय का? धर्मात बेभान होऊ नका, पारंपरिक पद्धतीने सण साजरे करा - मनसे प्रमुख राज ठाकरे

by Team Satara Today | published on : 06 September 2026


मुंबई : डीजे व डॉल्बीविरोधातील भूमिका मी आधीच घेतली होती. माझ्या घरी दीड दिवसांचा गणपती आहे. गणपती विसर्जन होते त्यावेळेस वाईट वाटते. तुम्ही डॉल्बी लावून आनंद कसला साजरा करताय? आपण उत्तरेतील संस्कृती महाराष्ट्रात आणतोय का? आपण त्यांना शिकवायचे की त्यांच्याकडून शिकायचे," असे सवाल करत महाराष्ट्राचा इतिहास जाणून घ्या. तुम्ही धर्मात बेभान होऊ नका. उत्सव ठीक आहे पण धर्मांधपणा आपल्याला खड्ड्यातच घेऊन जाणार याचे भान ठेवा. पारंपरिक पद्धतीने सण साजरे करा, असे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले. ते ठाणे येथे पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते.
नागपुरात 'डीजे' बंद आहे मग संपूर्ण महाराष्ट्रात का नाही?
सध्या पुण्यात डीजेविरोधात जे काही सुरू आहे यावर मुख्यमंत्री काय बोलले हे मला अजूनही कळालेले नाही. नागपुरात डीजे बंद झाला आहे, मग संपूर्ण महाराष्ट्रात हा नियम का नाही? असा सवाल करत तुम्ही डीजे व डॉल्बीच्या वादात अडकताय, मूळ प्रश्न बाजूला पाडण्याचे हे षड्यंत्र सुरू आहे, असा आरोपही राज ठाकरे यांनी यावेळी केला.
छत्रपती शिवराय, डॉ. आंबेडकर, महात्मा फुले यांच्या रांगेत दुसरे कोणीही बसत नाही
यावेळी राज ठाकरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या रांगेत कोणीही बसू शकत नाही. पंतप्रधानांचा फोटो शासकीय कार्यालयात असतोच पण तो त्या रांगेत नाही. कोणाबरोबर कोणाचे फोटो असावेत याचा नियम असावा, अशी मागणीही त्यांनी केली.
गणपतीच्‍या दिवसांमध्‍ये दंगली घडवल्‍या जातील
आता देशाची परिस्‍थिती अत्‍यंत वाईट आहे. महाराष्‍ट्रात गणपतीच्‍या दिवसांमध्‍ये दंगली घडवल्‍या जातील. जेणे करुन तुम्‍ही त्‍याच्‍यामध्‍ये अडकले पाहिजे, असा गंभीर आरोप करत धर्माची पुंगी वाजल्‍यानंतर लोक दात काढलेल्‍या नागासारखे डोलतायत. तुम्‍हाला जात आणि धर्मात गुंतवले जातयं. देशातील प्रत्‍येक नागरिकांनी याकडे डोळे उघडून मूळ प्रश्‍नांकडे पाहिजे पाहिजे. हिंदू आणि मुस्‍लीम बांधवांनी आता सतर्क राहावे, असे आवाहनही त्‍यांनी केले.
आपण कोठे चाललो आहे, आपण काय करतोय?
देशात धर्माविषयी झिंग आलीय. सध्‍या लोकप्रिय असणारा एक बुवाने परवा एक कथा सांगितली. तो म्‍हणाला की, रावणाला एक लाख मुले होती. ती रामबरोबरील युद्‍धात मारली गेली. युद्‍धातील सर्व शस्‍त्र रामाने सांगितल्‍याप्रमाणे हनुमानाने दहा हजार किलोमीटरवर जावून ही शस्‍त्रे ठेवली. त्‍याचे अस्त्रलाय झाले. पुढे याच अस्त्रलायचं ऑस्ट्रेलिया झालं. असे असेल तर हॉलंड इंग्‍लंड न्‍यूझीलंडचे काय करायचे, असा टोला लगावत. कोठे चाललाय देश, मुळे समस्‍या काय आहेत यावर कोण बोलणार, असे सवालही राज ठाकरे यांनी उपस्‍थित केले.
धर्माचा अभिमान असावा; पण धर्मांधता नको
आपल्‍याला आपल्‍या धर्माचा अभिमान असावा; पण धर्मांधता नको. पण सध्‍या देशात धर्माविषयी झिंग आलीय. धर्माच्‍या नावाखाली तुम्‍हाला मूळ प्रश्‍नांकडून बाजुला केले जातय. देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. १३ हजार भारतीय उद्‍योगपती देश सोडून बाहेर गेले. परदेशात शिकायला गेलेल्‍या मुले परदेशात स्‍थागित होतात. ते पुन्‍हा भारतात येण्‍यास तयार नाहीत, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.
मोदी परदेशात जातात आणि भारतीयांना सांगतात परेदशात जावू नका
मोदी परदेशात जातात आणि भारतीयांना सांगतात परदेशात जावून नका. देशाचा आर्थिक विकास होत आहे, असा दावा केला जातोय भारताचा जीडीपी वाढतोय तर परदेशात का जायचे नाही, सोने का खरेदी करायचे नाही, असा सवालही त्‍यांनी केला.
हिंदी भाषिक संमलेनाकडे दुर्लक्ष करा
हिंदी भाषिक संमलेन अमित शहा घेणार आहेत. याकडे दुर्लक्ष करा. हिंदी संमलेनास येवून अमित शहाचे हिंदी चांगले होवू शकत नाही, असा टोलाही त्‍यांनी लगावला. एन्‍स्‍टाग्रामवर तुम्‍हाला भडकवणार्‍या गोष्‍टी दिसतील. तुम्‍ही अजिताब भरकटले जाउ नका, असे आवाहनही त्‍यांनी केले


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
‘बाल विवाह मुक्‍त भारत’ अभियानाला जागतिक मान्यता; अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांची माहिती, ‘लेक लाडकी अभियान’, दलित महिला विकास मंडळाच्या योगदानाने सातार्‍याच्या शिरपेचात मानाचा तुरा
पुढील बातमी
झारखंडचे कॅबिनेट मंत्री सुदिव्य कुमार सोनू यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

संबंधित बातम्या