सातारा : सातारा शहरातून चार मोटरसायकलची चोरी करणार्या सराईत वाहन चोराला सातारा शहर पोलिसांनी सापळा रचून पाटखळ माथा येथे अटक केली आहे. रोहित सदानंद शेळके वय 20, रा. निंबोडी, ता. खंडाळा असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून तीन लाख वीस हजार रुपयांच्या चार मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली.
पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा शहरातील वाढत्या दुचाकींच्या चोर्यांसंदर्भात सातारा शहर पोलिसांना निर्देशित केले होते. सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला याबाबत तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक दादाभाऊ पवार यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम काळे यांनी सातारा शहरात पेट्रोलिंग वाढवली. त्यावेळेला एक संशयित युवक पोवई नाका येथे दिसून आला होता. मात्र त्याला पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता तो पोवई नाका एसटी स्टँड परिसरातून वाढेफाटा व तेथून पाटखळ माथा परिसराच्या दिशेने बेपत्ता झाला होता. सातारा शहर पोलिसांनी पाटखळ माथा येथे कसून शोध मोहीम राबवली. दरम्यान संबंधित युवक लोणंद रस्त्यावर असल्याची माहिती मिळताच लोणंद रोडवर पोलिसांनी त्याला पाठलाग करून ताब्यात घेतले. या युवकाने सातारा शहर परिसरातून चार मोटरसायकलची चोरी केल्याचे कबूल केले आणि चोरीच्या मोटरसायकल सुद्धा पोलिसांच्या ताब्यात दिल्या.
या कारवाईमध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अभिजीत यादव, सुधीर गोरे, निलेश यादव, अमर काशीद, सुजित भोसले, निलेश जाधव, विक्रम माने, पंकज मोहिते, तानाजी भोंडवे, इरफान मुलाणी, तुषार भोसले, सागर गायकवाड, संतोष घाडगे, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम यांनी सहभाग घेतला.