बंगळुरू : बंगळुरू आणि दक्षिण कर्नाटकातील इतर भागात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. फेंगल चक्रीवादळाचा परिणाम बंगळुरुमध्ये होताना पहायला मिळत आहे. भारतीय हवामान खात्याने आज बंगळुरु आणि दक्षिण कर्नाटकातील इतर भागात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 30 नोव्हेंबरच्या रात्री फेंगल चक्रीवादळाने तामिळनाडू किनारपट्टीवर धडक दिली. तेव्हापासून बंगंळुरुमध्ये अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे.
IMD ने बेंगळुरू आणि आसपासच्या परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. कामाशिवाय कोणीही घराबाहेर पडून नये, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. अतिवृष्टीचा इशारा असूनही, बंगळुरूमधील शाळा आणि महाविद्यालये नेहमीप्रमाणे सुरू आहेत. शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर संबंधित पालक आणि रहिवाशांकडून आक्रोश निर्माण झाला आहे. शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.
केंद्रशासित प्रदेश आणि तामिळनाडूमधील इतर ठिकाणांवर फेंगल चक्रीवादळाचा परिणाम झाला आहे. काही ठिकाणी भीषण पूरस्थिती निर्माण झाली असून लष्कराने पूरग्रस्त रस्त्यावर अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. फेंगल चक्रीवादळाचा जोर आता काहीसा कमी झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र त्याचा परिणाम अजूनही लोकांवर होत आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सोमवारी सांगितले की, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या उत्तर किनाऱ्यावरील चक्रीवादळ फेंगल, गेल्या सहा तासांत 7 किमी/तास वेगाने पश्चिम-वायव्य दिशेने सरकले आणि 1 डिसेंबर (रविवार) रोजी रात्री 11.30 वाजता ते केंद्रस्थानी होते.
आयएमडी बंगळुरूचे संचालक सीएस पाटील यांनी सांगितले की, “पुढील तीन दिवस शहरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, दक्षिण कर्नाटकातील अंतर्गत भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे, आणि कर्नाटकच्या अंतर्गत भागात उत्तरेला काही ठिकाणी हलका पाऊस पडेल.” सततच्या मुसळधार पावसामुळे, IMD ने दक्षिण कन्नड, उडुपी, शिवमोग्गा, चिक्कमगालुरू, हसन, कोडागु, म्हैसूर आणि चामराजनगरसह अनेक जिल्ह्यांसाठी 2 आणि 3 डिसेंबरसाठी यलो अलर्ट जारी केला.