बांगलादेश : बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा अस्थिर परिस्थिती निर्माण होत आहे. शेख हसीना सरकार कोसळल्यापासून अन् महम्मद युनूस यांनी सत्ता हाती घेतल्यापासून सरकारविरोधात नागरिकांचा रोष वाढत चालला आहे. आता बांगलादेशमधील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस चीन दौऱ्यावर पोहचले आहेत. मोहम्मद युनूस चीनमध्ये जाताच अमेरिकन लष्कराचे वरिष्ठ अधिकारी ढाकात दाखल झाले. त्यांनी बांगलादेश लष्कराचे प्रमुख वकार उल जमान यांची भेट घेतली. दोन्ही सैन्य अधिकाऱ्यांनी दोन्ही देशांमधील सैनिक संबंधांवर चर्चा केली.
अमेरिकन लष्कराचे डिप्टी कमांडिंग जनरल लेफ्टिनेंट जनरल जोएल पी. वॉवेल बांगलादेशात आले. त्यांनी बांगलादेश लष्कराचे प्रमुख वकार उल जमान यांच्याशी चर्चा केली. त्यांनी बांगलादेश लष्करास मदत करण्याचे आश्वासन दिले. बांगलादेश लष्कराची क्षमता वाढवण्यासाठी योगदान देण्याचे सांगितले. चर्चेदरम्यान बांगलादेशसमोर असलेले लष्करी आव्हान आणि संभावित क्षेत्र यावर चर्चा केली. अमेरिका बांगलादेशला कुठे मदत देऊ शकतो? आणि ‘टायगर लाइटनिंग’ युद्धाभ्यासावर विचार-विमर्श करण्यात आला.
बांगलादेश आणि अमेरिकेच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांमध्ये बांगलादेशची सैन्य क्षमता मजबूत करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यासाठी अमेरिकन लष्करी सामग्री खरेदीबाबत प्रस्ताव ठेवण्यात आला. वॉवेल संयुक्त राज्य अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडच्या रणनीती योजनेचे डिप्टी कमांडिंग जनरलसुद्धा आहे. ते अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस देशात नसताना आले आहेत. त्यामुळे बांगलादेशमधील परिस्थितीबाबत त्यांनी काय चर्चा केली असणार? त्याची उत्सुक्ता आहे.
बांगलादेश अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस सध्या चीन दौऱ्यावर आहेत. बुधवारी ते हेनान प्रांतात पोहचले. त्या ठिकाणी असलेल्या बोआओ फोरम फॉर एशिया वार्षिक सम्मेलन 2025 मध्ये त्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमात लाओचे पंतप्रधान सोनेक्से सिफांडोने, चीनच्या स्टेट काउंसिलचे कार्यकारी उपपंतप्रधान डिंग जुएक्सियांग, बोआओ फोरम उपस्थित होते.
बांगलादेशमध्ये गेल्या वर्षी विद्यार्थ्यांचे जनआंदोलन झाले होते. त्या हिंसक आंदोलनामुळे तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून यावा लागला. सध्या त्या भारतात आहेत. शेख हसीना यांचे पद गेल्यानंतर भारत-बांगलादेशातील संबंध तणावाचे आहे.