माहुलीतील विद्यार्थ्यांच्या हातात ‘खेळण्यांचा खजिना’; 'साहित्यवेल'च्या गावोगावी वाचन प्रसार जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

by Team Satara Today | published on : 08 September 2026


सातारा  : जनमनात वाचनाची गोडी निर्माण व्हावी, पुस्तकांशी नाते दृढ व्हावे आणि वाचनातून विचारशील व सर्जनशील समाज घडावा, या उद्देशाने साहित्यवेल वाचन प्रसार चळवळीने गावोगावी वाचन प्रसार जनजागृती अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत माहुली येथे विद्यार्थ्यांना पुस्तक भेट देण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विचार मंच, माहुली आणि साहित्यवेल वाचन प्रसार चळवळीच्या संयुक्त विद्यमाने दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक, माहुली येथे इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रसिद्ध विज्ञानप्रसारक अरविंद गुप्ता लिखित ‘खेळण्यांचा खजिना’ हे पुस्तक भेट देण्यात आले.
प्रास्ताविक करताना प्रा. फाळके किरण यांनी साहित्यवेल वाचन प्रसार चळवळीच्या वाचन प्रसार अभियानाची भूमिका स्पष्ट केली. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, विविध साहित्यप्रकारांची ओळख करून देणे, वाचनाची सवय विकसित करणे आणि वाचनातून विद्यार्थ्यांच्या विचारक्षमतेला चालना देणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
माहुली येथील लेखक सचिन अवघडे यांनी विद्यार्थ्यांना अरविंद गुप्ता यांच्या ‘खेळण्यांचा खजिना’ या पुस्तकाची ओळख करून दिली. सहज उपलब्ध तसेच टाकाऊ साहित्याचा कल्पकतेने उपयोग करून विविध खेळणी व आकर्षक वस्तू तयार करता येतात, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पुस्तकातील कृती प्रत्यक्ष करून पाहिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या निरीक्षणशक्तीला, कल्पनाशक्तीला आणि सर्जनशीलतेला चालना मिळते, असे त्यांनी सांगितले.
वाचन हे केवळ ज्ञान मिळविण्याचे साधन नसून विचार करण्याची आणि नव्या कल्पना निर्माण करण्याची प्रक्रिया आहे, असे सांगत सचिन अवघडे यांनी विद्यार्थ्यांनी नियमित वाचन करण्याचे आवाहन केले. वाचनामुळे विचार करण्याची क्षमता विकसित होते, विविध विषय जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होते आणि व्यक्तिमत्त्व विकासास मदत होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या उपक्रमात वेदिका विनोद फाळके, दुर्गा अमोल फाळके, श्रावणी अमोल फाळके, रुद्र अमोल फाळके, आरोही अमित फाळके, अनुष्का अमित फाळके, शंभू अमित फाळके, आर्यन नामदेव फाळके, दिग्विजय शामराव फाळके, स्वरा किरण फाळके, अवनीश दिगंबर फाळके, वैष्णवी सिद्धनाथ फाळके, विराज संतोष फाळके, रुद्र बाबुराव वायदंडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमास विनोद फाळके, शामराव फाळके, सिद्धनाथ फाळके, धोंडीराम फाळके, रोहन दुबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अखेरीस मा. नामदेव फाळके यांनी उपस्थितांचे आभार मानले.
पुस्तक भेटीतून वाचनाची गोडी, कृतीतून शिकण्याची प्रेरणा आणि कल्पकतेला नवी दिशा देणारा माहुली येथील हा उपक्रम साहित्यवेलच्या गावोगावी सुरू असलेल्या वाचन प्रसार जनजागृती अभियानातील महत्त्वपूर्ण टप्पा ठरला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
१२ तासांत १० लाख प्रेक्षकसंख्या पार; खेड शिवापूर टोलनाक्यावरील वाहन तपासणीच्या ‘सातारा टुडे’च्या चित्रफितीला समाजमाध्यमांवर प्रचंड प्रतिसाद, पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
पुढील बातमी
साताऱ्यात पार्किंग सुविधा निर्माण करण्याची गरज; योग्य जागा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी

संबंधित बातम्या