सोलापूरचा महेंद्र गायकवाड 'हिंदकेसरी'; सातार्‍यातील थरारक लढतीत पृथ्वीराज मोहोळ जखमी

by Team Satara Today | published on : 18 May 2026


सातारा: भारतीय कुस्ती महासंघाच्या मान्यतेने आणि सातारा तालीम संघाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेली ५२ वी 'हिंदकेसरी' कुस्ती स्पर्धा अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडली. या स्पर्धेच्या अंतिम लढतीत सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याने मानाची गदा पटकावत 'हिंदकेसरी' किताबावर आपले नाव कोरले. चुरशीच्या ठरलेल्या या अंतिम लढतीत पुण्याचा मल्ल पृथ्वीराज मोहोळ हा जखमी झाल्याने महेंद्र गायकवाडला विजयी घोषित करण्यात आले.

​छत्रपती शाहू स्टेडियमवर रंगलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ एकमेकांसमोर ठाकले होते. कुस्तीला सुरुवात होताच दोघांनीही आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र, डाव टाकत असताना पृथ्वीराजच्या हाताला गंभीर दुखापत झाली. डॉक्टरांनी तात्काळ तपासणी केल्यानंतरही पृथ्वीराजने पुन्हा मैदानात उतरण्याचा प्रयत्न केला, मात्र वेदना असह्य झाल्याने त्याने माघार घेतली. परिणामी, महेंद्र गायकवाडला हिंदकेसरी म्हणून घोषित करण्यात आले.

​महिलांच्या कुस्ती स्पर्धेतही मोठी चुरस पाहायला मिळाली. यामध्ये हरियाणाच्या काजल हिने दिल्लीच्या खुशी हिचा पराभव करत महिला गटातील मानाची गदा पटकावली. सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवणाऱ्या काजलने ही लढत चितपट करून विजय मिळवला.

​या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याबाबत माहिती देताना सुधीर पवार यांनी सांगितले की, विजेत्या मल्लांना येत्या ३० मे रोजी तालीम संघ येथे आयोजित कार्यक्रमात वाहने आणि रोख रकमेचे धनादेश देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

​या स्पर्धेच्या सांगता समारंभाला भारतीय शैली कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय कुमार, महाराष्ट्र अध्यक्ष नितीन बारणे, सचिव गौरव रोहनलाल यांच्यासह हिंदकेसरी अर्जुन आबाधिया, मोहन खोपडे, कुस्ती महर्षी साहेबराव पवार, दीपक पवार, ऑलिम्पिकवीर अशोक गर्ग, अर्जुनवीर पै. काका पवार आणि महाबली सतपाल अशा दिग्गज मान्यवरांची उपस्थिती होती. तसेच किर्गिस्तानच्या माजी उपपंतप्रधान सुलताना बेकोवा, पालकमंत्री शंभुराज देसाई, आमदार मनोज घोरपडे, उद्योजक संग्राम घोरपडे आणि अजिंक्य साळुंखे यांनीही उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवला. सातार्‍यातील या ऐतिहासिक कुस्ती स्पर्धेने कुस्तीप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोल्हापूर परिक्षेत्राचे नूतन विशेष पोलिस महानिरीक्षकपदी रंजन शर्मा यांना सात भाषा आहेत अवगत ; महाराष्ट्र कॅडरचे २००६ चे आयपीएस अधिकारी

संबंधित बातम्या