सातारा : देऊर ता. कोरेगाव चे सुपुत्र अनिकेत नंदा जितेंद्र शिंदे यांनी संघ लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये देशात १८ वा क्रमांक पटकावला. त्यांची इपीएफओ अंमलबजावणी अधिकारी, भारत सरकार या पदी निवड झाली आहे.
यापूर्वीही त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा २०२३ परीक्षेमध्ये राज्यात ९२ वा क्रमांक मिळवून महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रित अधिकारी पदी निवड झाली आहे. शिंदे यांचे शिक्षण देऊर येथील श्री मुधाईदेवी विद्यामंदिर येथे व त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण सयाजीराव हायस्कूल सातारा येथे झाले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी येथे त्यांनी बि. टेक ही अभियांत्रिकी पदवी मिळवली आहे. कुटुंबाच्या व मित्र-मैत्रिणींच्या भक्कम पाठिंब्यामुळे आणि अभ्यासातील सातत्यामुळे आपण हे यश मिळवू शकलो अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.