पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये तलवारीने प्राणघातक हल्ला; खाजगी रुग्णालयात तातडीचे उपचार

by Team Satara Today | published on : 13 August 2026


नांदेड : विशेष सुरक्षा पथक (एसपीयू), खाजगी अंगरक्षक आणि नांदेड पोलिसांच्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत असतानाही पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंघ बादल यांच्यावर येथून जवळच असलेल्या ऐतिहासिक माता साहिब गुरुद्वारा परिसरात गुरुवारी दुपारी प्राणघातक हल्ला झाला. त्यात त्यांच्या हाताला दुखापत झाली असून खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर तातडीचे उपचार करण्यात आले. हल्लेखोरास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बादल यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

​नांदेड शहरापासून १० कि.मी. अंतरावर गोदावरी नदीकाठी असलेल्या माता साहिब गुरुद्वारातील वरील थरारक घटनेची माहिती समोर येताच नांदेडपासून नवी दिल्ली-अमृतसरपर्यंत एकच खळबळ उडाली. या गुरुद्वारात बादल यांनी सहपरिवार दर्शन घेतल्यानंतर बाहेर येत असताना निहंगसिंघाची वस्त्रे परिधान केलेल्या हल्लेखोराने त्यांच्यावर कृपाण (छोटी तलवार)ने वार केला. बादल यांच्यासोबत असलेल्या एसपीयूचे निरीक्षक केंद्रे यांनी चपळाई दाखविल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगण्यात आले. या हल्ल्यात बादल यांच्या उजव्या हाताला इजा झाली. त्यातून मोठा रक्तस्रावही झाला; पण त्यांना तात्काळ नांदेडच्या यशोसाई रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुखबीरसिंघ बादल हे बुधवारी सायंकाळी गुरुद्वारा दर्शनासाठी नांदेडमध्ये दाखल झाल्यापासून एसपीयूसह स्थानिक पोलीस यंत्रणा अत्यंत सतर्क होती. बादल यांच्यासोबतचा ताफा गुरुवारी दुपारी माता साहिब गुरुद्वारामध्ये पोहोचला तेव्हा या ताफ्यात अधिकारी व कर्मचारी मिळून चाळीसहून अधिक जण बंदोबस्तामध्ये होते. प्रमुख अधिकार्‍यांची सर्वत्र करडी नजर असतानाही त्यांना चुकवून हल्लेखोराने बादल यांना लक्ष्य केले, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी हल्लेखोरास तेथेच ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली; पण सुरुवातीला त्याने आपले नाव व अन्य माहिती सांगण्यास नकार दिला. नंतर त्याला पोलीस बंदोबस्तात मुदखेड पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

वरील घटनेनंतर सुरक्षा व्यवस्थेतील अधिकार्‍यांनी बादल यांना रुग्णालयात नेेणे व त्यांच्यावर उपचार सुरू करणे यास प्राधान्य दिल्यामुळे हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. हल्लेखोराचे वय ५० ते ५५ दरम्यान असावे तसेच तो नांदेड किंवा स्थानिक परिसरातला नव्हे तर बाहेरून आलेला असावा, असा अंदाज नांदेड पोलीस दलातील घटनास्थळी प्रत्यक्ष हजर असलेल्या एका अधिकार्‍याने व्यक्त केला. ही घटना पावणेदोन वाजण्याच्या सुमारास घडल्याचेही या अधिकार्‍याने सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शिवसेना चिन्ह प्रकरणात नवा ट्विस्ट! अपात्र व्यक्तीलाच मुख्यमंत्री केलं; कोर्टात कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद, सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे प्रकरण पाठवण्याची मागणी
पुढील बातमी
कॉकरोच जनता पार्टीला बैठकीसाठी जागा मिळू नये म्हणून भाजपकडून दबाव - अभिजीत दीपके यांचा आरोप

संबंधित बातम्या