जिल्हयात महायुतीच्या घटक पक्षामध्ये अंतर्गत लाथाळ्या; भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगचे वेगळे राजकारण, ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर मोठी जबाबदारी

by Team Satara Today | published on : 18 November 2025


सातारा  :  जिल्ह्याच्या राजकारणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर भारतीय जनता पार्टीच्या मायक्रो प्लॅनिंगचे वेगळे राजकारण पाहायला मिळाले. सूत्रबद्ध पद्धतीने पक्षादेश राबवून भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी जिल्ह्यामध्ये आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा घवघवीत यश मिळवण्याच्या दृष्टीने ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून पावले टाकली आहेत. जिल्ह्यात भाजप हाच थोरला भाऊ आहे याचा संदेश महायुतीच्या घटक पक्षांना दिला आहे.

साताऱ्यामध्ये मनोमिलनातील राजकीय कश्मकश

साताऱ्यामध्ये खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या राजकीय नात्यातील जबरदस्त कश्मकश पाहायला मिळाली. पण निर्णयाक क्षणी शिवेंद्रसिंहराजे यांचे मुरब्बी राजकारण वरचढ ठरले आणि त्यांचे समर्थक अमोल मोहिते यांच्या गळ्यात नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची  माळ पडली. महाविकास आघाडीने येथे प्रचंड कसरत केली तिन्ही घटक पक्षाने मिळून 45 उमेदवार दिले असले तरी त्यांचे किती आव्हान आहे याचे उत्तर तीन डिसेंबर रोजी मिळणार आहे.

कराडमध्ये अतुल भोसले यांची आक्रमक रणनीती

कराड पालिका स्वबळावर लढण्यासाठी जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक प्रयत्न केले .जनशक्ती आघाडीच्या माजी नगराध्यक्षा शारदा जाधव घोटाळा त्यांनी सोबत घेत मजबूत मूठ बांधण्याचा प्रयत्न केला .केंद्र लेवल ते बूथ लेवल या दरम्यान भाजपची वातावरण निर्मिती करण्यात आतून भोसले यांना यश आले आहे. माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या लोकशाही आघाडीने यशवंत विकास आघाडीची हात मिळवणी केली आहे. काँग्रेसच्या एका गटांनी स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत त्यामुळे कराडात तिरंगी लढत पाहायला मिळेल नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून विनायक पावसकर आघाडी कडून राजेंद्र सिंह यादव आणि काँग्रेसकडून झाकीर पठाण यांची उमेदवारी आहे.

मलकापूरमध्ये राष्ट्रवादीला भाजपचे आव्हान

मलकापूर नगरपंचायतीमध्ये भाजपने आपल्या राजकीय बांधणीची चुणूक जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांच्या माध्यमातून दाखवली.पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक मनोहर शिंदे यांनाच भाजपच्या गोटात घेऊन सर्व समीकरणे फिरवण्यात आली.मलकापूर मध्ये आता भाजप विरुद्ध राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा उरलेला गट अशी लढत होणार आहे. भाजपने तेजस सोनवणे तर राष्ट्रवादीने आर्यन कांबळे यांना नगराध्यक्षपदासाठी संधी दिली आहे. मलकापूर नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादीला जंग जंग पछाडावे लागेल अशी रणनीती आखण्यात आली आहे. 

फलटणमध्ये पहिल्यांदाच पक्ष पातळीवर निवडणूक

फलटण पालिकेमध्ये पहिल्यांदाच आघाडी कडून निवडणूक पक्ष पातळीवर गेली आहे .आजपर्यंत रामराजे गट विरुद्ध रणजीत सिंह नाईक निंबाळकर अशी लढत असायची.रामराजे गटाने शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढवण्याचा धक्कादायक निर्णय घेत राजकारणाला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला तर रणजितसिंह नाईक निंबाळकर गट भाजप व राष्ट्रवादीच्या युतीतून निवडणुकीला सामोरा जात आहे. रामराजे यांचे चिरंजीव अनिकेतराजे शिवसेनेकडून तर भाजप व राष्ट्रवादीकडून रणजीतसिंह यांचे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. रामराजे गटासाठी ही अस्तित्वाची तर रणजीत सिंह निंबाळकर निंबाळकर यांच्यासाठीही प्रतिष्ठेची निवडणूक ठरली आहे .महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे सचिन सूर्यवंशी बेडके यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे

म्हसवडमध्ये राष्ट्रवादी व रासपला भाजप देणार टक्कर

मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हसवड पालिकेत आपली राजकीय रणनीती पुन्हा एकदा राबवली आहे. शरद पवार गटाचे उमेदवार प्रभाकर देशमुख राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. राष्ट्रवादीचे दोन्ही गट व राष्ट्रीय समाज पक्ष यांनी एकत्र येऊन स्वतंत्र पॅनल टाकत भाजपला आव्हान उभे केले आहे .शेखर गोरे यांनी सुध्दा राजकीय तडजोड करण्याचा प्रयत्न केला त्यांनी नगराध्यक्ष पद व आठ नगरसेवकांच्या जागेवर उमेदवार उभे केले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून पूजा विरकर महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे भुवनेश्वरी राजे माने तर शेखर गोरे यांनी गौरी माने यांना उमेदवारी दिली आहे .

भाजपचे महाबळेश्वमध्ये अहिस्ते कदम

महाबळेश्वर पालिकेत शिंदे गट उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गट यांचे राजकीय प्राबल्य असल्याने गिरीस्थान नगरपालिकेमध्ये भाजपने चार जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत .स्थानिक आघाड्यांची समीकरणे म्हणून भारतीय जनता पार्टीने येथे फारशी ताकद लावली नाही. जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे येथील हालचालींवर बारकाईने लक्ष आहे. या पालिकेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिंदे गट आणि राष्ट्रवादी यांच्या तिहेरी लढत होणार आहे. राष्ट्रवादीने सुनील शिंदे, शिवसेनेने कुमार शिंदे यांना संधी दिली आहे. उद्धव ठाकरे गटाकडून डी.  एम. बावळेकर व राजेश कुंभारदरे यांनी स्वतंत्र अर्ज भरले आहेत.

 लक्ष्मी कराडकर यांच्या साथीने भाजपचे राष्ट्रवादीला आव्हान

पाचगणी नगरपालिका ही आधी अपक्षांचा विजय, नंतर पालिकेत आघाडी अशा समीकरणाची नगरपालिका आहे. येथील लक्ष्मीताई कराडकर यांना बरोबर घेऊन भारतीय जनता पार्टीने शिवसेना यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी अजितदादा गटाला आव्हान देण्याचा जोरदार प्रयत्न केला आहे. भाजपने चार जागांवर तर बारा जागांवर कराडकर गटांने उमेदवारी अर्ज भरले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी कराडकर गटाचा अजेंडा अद्याप गुलदस्त्यात आहे. विरोधी गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारा बाबतही अद्याप सस्पेन्स कायम आहे .कराडकर यांचे समर्थन मिळवण्यासाठी भाजपने जोरदार रणनीती आखली आहे.

मेढा नगरपंचायत - भाजपला शिवसेना व शरद पवार गटाचे आव्हान

मेडा नगरपंचायतीसाठी मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी भाजपचे स्वतंत्रपणे उभे केले आहे .त्यांच्या विरोधात शिवसेना व शरद पवार गटाचे एकत्रित आव्हान उभे करण्यात आले आहे भाजप रूपाली वारागडे यांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून संधी दिली आहे तर शिवसेनेच्या वतीने रेश्मा करंजेकर व शरद पवार गटाच्या सुनीता पार्टे यांनी नगराध्यक्ष पदासाठी स्वतंत्र अर्ज भरले आहे त्यामुळे कोण्या एका उमेदवाराचा अर्ज माघारी घेतला जाण्याची शक्यता आहे .शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी येथे कुठेही बंडखोरीचा दगाफटका होणार नाही याची काळजी घेत उमेदवारांना अर्ज भरण्याच्या सूचना दिल्या होत्या .भाजपचे सक्रिय संघटन येथे काम करत असल्याने शिवसेना व शरद पवार गटाला जोरदार परिश्रम करावे लागतील

मंत्री मकरंद आबांना बालेकिल्ल्यात आव्हान

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या अजित दादा पवार गटाला भाजपने माजी आमदार मदन भोसले यांनी जोरदार आव्हान दिले आहे. भाजपने राष्ट्रवादीतून आयात केलेले नगराध्यक्ष अनिल सावंत हिना नगराध्यक्ष पदासाठी संधी दिली आहे तर राष्ट्रवादीने डॉक्टर नितीन कदम या नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून तेजपाल वाघ तर शिवसेनेकडून योगेश फाळके यांचा उमेदवारी अर्ज नगराध्यक्ष पदासाठी दाखल झाला आहे.भारतीय जनता पार्टीचा झेंडा वाई पालिकेवर फडकवण्याच्या दृष्टीने जोरदार रणनीती आखण्यात आली आहे. 

सुनील माने यांच्या साम्राज्याला आव्हान

रहिमतपूर मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी राष्ट्रवादी अजितदादा गटात प्रवेश केला येथे लढत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी होणार होती मात्र अर्ज भरण्याच्या दिवशी राष्ट्रवादीला शिवसेनेचे वासुदेव माने यांनी पाठिंबा दिला त्यामुळे येथील लढत राष्ट्रवादी शिवसेना विरुद्ध भाजपाशी होणार आहे .राष्ट्रवादीकडून सुनील माने यांच्या पत्नी नंदना माने यांना तर भाजपने निलेश माने यांच्या पत्नी वैशाली माने यांना उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी दुरंगी लढत होणार आहे. भाजपमध्ये चित्रलेखा माने कदम व निलेश माने असे दोन गट आहेत त्यांच्यात नगराध्यक्ष पदाबाबत एक मत झाले असले तरी दोन नगरसेवक पदावर एकमत झाले नसल्याने दोन्ही गटांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
देश एकसंध ठेवण्यात वल्लभभाई पटेल यांचे अमूल्य योगदान - जिल्हाधिकारी संतोष पाटील; दुमदुमला राष्ट्रीय एकतेचा जयघोष ; माय भारत सरदार वल्लभभाई पटेल युनिटी मार्च उत्साहात
पुढील बातमी
दागिने लुबाडणारी गुन्हेगारांची टोळी जेरबंद; भुईंज पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, १८ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

संबंधित बातम्या